महापौर रवि लांडगे यांचा ‘मोफत नोकरी’चा मास्टरप्लॅन;गरजू मुला-मुलींसाठी ‘शून्य रुपये’ खर्चात करिअरची संधी
भोसरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्यातील आणि परराज्यातील हजारो तरुण-तरुणी रोजगाराच्या शोधात पिंपरी-चिंचवड आणि चाकण या औद्योगिक नगरीत येत असतात. मात्र, योग्य मार्गदर्शनाअभावी अनेकदा त्यांची आर्थिक फसवणूक होते, तर कधी नोकरीसाठी मोठी रक्कम मागितली जाते. तरुणांची ही वणवण थांबवण्यासाठी आणि त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि बाबासाहेब लांडगे यांच्या संकल्पनेतून ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ भोसरी आणि चाकण येथे सुरू करण्यात आले आहे. भोसरी येथील संविधान चौका जवळ असलेल्या फुगे प्रायमा येथे ‘महापौर युवा संकल्प रोजगार, कौशल्य विकास व करिअर मार्गदर्शन केंद्र’ या कार्यालयाचे उद्घाटन (दि.९) महापौर रवि लांडगे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी डॉ संजय झोपे, संदीप पलांडे, प्रकाश लांडगे, कैलास लांडगे,प्रथमेश शेलार, आकाश कंद, प्रतीक शिंदे, ॲड प्रतीक बोराडे, संदीपक राठी, निखिल मसने, प्रशांत पवार, रुपेश खोपडे, जयश्री वाघमोडे, कांचन जगताप, कृष्णा अगरवाल, अब्दुल अहमद आदी उपस्थित होते.
या केंद्राच्या वैशिष्ट्यांबद्दल माहिती देताना महापौर रवि लांडगे यांनी सांगितले की,ज्या मुलांकडे कौशल्य आहे पण आर्थिक परिस्थितीमुळे ते मागे पडतात, अशा शेवटच्या घटकातील मुला-मुलींना या केंद्रातून १००% मोफत सेवा मिळणार आहे.बाहेरून येणाऱ्या अनेक होतकरू मुलांना राहण्याची जागा शोधण्यापासून ते जॉब मिळवण्यापर्यंत प्रचंड मानसिक आणि आर्थिक त्रास सहन करावा लागतो. अनेकदा एजंटकडून त्यांची फसवणूक केली जाते. हा अन्याय थांबवण्यासाठी आम्ही ही केंद्रे पूर्णपणे ‘विनामूल्य’ सुरू केली आहेत. येथे नोंदणी, नोकरीच्या संधी, राहण्याबाबत मार्गदर्शन आणि करिअर समुपदेशन अशा सर्व सेवा मोफत मिळतील. ‘विनामूल्य नोकरी’ हेच आमचे मुख्य उद्दिष्ट असून तरुणांनी एका रुपयाचाही खर्च न करता या संधीचा लाभ घ्यावा. रोजगाराच्या शोधात असलेल्या आतापर्यंत जवळपास दोन हजार युवक-युवतींनी याचा लाभ घेतला आहे.
दहावी, बारावी, आयटीआय (ITI), डिप्लोमा, इंजिनिअरिंग (B.E, M.E, M.Tech) तसेच बी.ए, बी.कॉम, बी.एससी अशा सर्व शैक्षणिक पात्रता असलेल्या उमेदवारांसाठी हे केंद्र मार्गदर्शक ठरणार आहे. भोसरी येथील संविधान चौक फुगे प्रायमा,A विंग मधील तिसरा मजला ऑफिस नंबर १२ आणि चाकण येथील कॅपिटल स्क्वेअर अशा दोन ठिकाणी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून, जास्तीत जास्त युवकांनी येथे नाव नोंदणी करून आपल्या उज्ज्वल भविष्याची मुहूर्तमेढ रोवावी.विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी तरुणांना केवळ नोकरीच नाही, तर सन्मानाचे आयुष्य देणे हे आमचे कर्तव्य आहे,अशा शब्दांत महापौर रवि लांडगे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
