Spread the love
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या आज झालेल्या बैठकीत शहरातील विविध विकासकामे व विभागनिहाय प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात पार पडलेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते.
महापालिकेच्या पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय भवनात झालेल्या या बैठकीच्या अध्यक्षस्थानी स्थायी समितीचे सभापती अभिषेक बारणे होते. यावेळी स्थायी समिती सदस्य शालिनी गुजर, मनीषा चिंचवडे, संदीप कस्पटे, सारिका गायकवाड, योगिता नागरगोजे, कृष्णा सुरकुले, अर्चना करांडे, मधुरा शिंदे, बाबासाहेब त्रिभुवन, सविता आसवानी, शीतल वर्णेकर, संतोष कोकणे, संदीप वाघेरे, विकास साने, सुलभा उबाळे यांच्यासह नगरसचिव मुकेश कोळप, अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे, विक्रांत बगाडे तसेच महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
सेक्टर २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रातील विविध केमिकल टाक्यांना सुरक्षा आवरण उभारणे व अनुषंगिक कामे करण्यास मान्यता देण्यात आली. तसेच प्रभाग क्र. २ मधील मोशी-बोऱ्हाडेवाडी परिसरात स्थापत्य विषयक कामे, नाल्यांची व पावसाळी चेंबर्सची साफसफाई तसेच चिखली-मोशी भागातील स्वच्छतागृहांची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. प्रभाग क्र. ९ मधील नेहरूनगर व खराळवाडी येथे स्थापत्य विषयक कामे तसेच प्रभाग क्र. २९ पिंपळे गुरव येथे रोड फर्निचर दुरुस्तीची कामे करण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १६ अंतर्गत रावेत, किवळे, मामुर्डी, विकासनगर, साईनगर, कोतवालनगर येथे रस्ते दुरुस्ती, महापालिका इमारती, स्मशानभूमी व इतर आवश्यक ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच रावेत येथील इंद्रप्रभा सोसायटी रस्त्यावर रस्ता रुंदीकरणात अडथळा ठरणारे महापारेषण कंपनीचे १३२ केव्ही क्षमतेचे दोन वीज मनोरे हलविण्यास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्र. १७ मधील महापालिका इमारती व इतर ठिकाणांची देखभाल-दुरुस्ती तसेच वाल्हेकरवाडी येथील रस्ते दुरुस्तीची कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. याशिवाय ग, ड, ब, फ व ई क्षेत्रीय कार्यालयांतर्गत विविध झोपडपट्टी परिसरांमध्ये (आदर्शनगर, मिलिंदनगर, शास्त्रीनगर, सुभाषनगर, कैलासनगर, महात्मा गांधीनगर, इंदिरानगर, बलदेवनगर, संजय गांधीनगर, तापकीरनगर, आण्णाभाऊ साठे नगर, काळाखडक-म्हातोबानगर, वेताळनगर, विजयनगर, मोरयानगर, एम.बी. कॅम्प, नागसेननगर, भोईरनगर, संतोषनगर, दुर्गानगर, अजंठानगर, राजनगर, सम्राटनगर, सिद्धार्थनगर, मोरेवस्ती, गांधीनगर, बालाजीनगर, शांतीनगर) येथे स्थापत्य दुरुस्ती, गटार व स्टॉर्म वॉटर लाईन टाकणे आदी कामे करण्यास मंजुरी देण्यात आली.
महापालिका शाळा, दवाखाने व मुख्य प्रशासकीय इमारतीची देखभाल-दुरुस्ती व फर्निचर कामे करण्यास मंजुरी देण्यात आली. तसेच क क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सार्वजनिक शौचालयांची उच्चदाब पाण्याच्या फवाऱ्याद्वारे यांत्रिकी पद्धतीने व मनुष्यबळाच्या सहाय्याने दैनंदिन साफसफाई, देखभाल व किरकोळ दुरुस्ती करण्यास मान्यता देण्यात आली.
याशिवाय, स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत GIS सक्षम ERP प्रणालीसाठी व्हर्च्युअल मशिन उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात आली. आरोग्य विभागांतर्गत नवीन थेरगाव, जिजामाता, भोसरी, तालेरा रुग्णालय तसेच ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरियल हॉस्पिटल येथे कार्यरत तज्ञ वैद्यकीय अधिकाऱ्यांना मुदतवाढ देण्यास तसेच यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयांतर्गत शंकरराव मासुळकर नेत्र रुग्णालयासाठी उपकरण खरेदीस मंजुरी देण्यात आली.
संत तुकाराम महाराज संतपीठासाठी आवश्यक तरतूद वर्ग करणे, ड क्षेत्रीय कार्यालयांतर्गत सावित्रीबाई फुले उद्यानातील उर्वरित विद्युत कामे पूर्ण करणे, अ क्षेत्रीय कार्यालयांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती व महात्मा फुले जयंतीनिमित्त तात्पुरती ध्वनी व प्रकाश व्यवस्था करणे तसेच प्रभागांतर्गत पाने-फुले-फळे-भाजीपाला स्पर्धा व इतर कार्यक्रमांसाठी तात्पुरती ध्वनीव्यवस्था, सीसीटीव्ही व प्रकाशयोजना करणे आदी विषयांना येणाऱ्या खर्चास स्थायी समिती सभेत मंजुरी देण्यात आली.
पिंपरी चिंचवड शहराचा नियोजित आणि सर्वसमावेशक विकास साध्य करण्याच्या दृष्टीने आजच्या स्थायी समिती बैठकीत विविध महत्त्वपूर्ण प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. रस्ते, पायाभूत सुविधा, स्वच्छता, आरोग्य सेवा आणि झोपडपट्टी भागांतील मूलभूत सुविधा यांसारख्या विषयांवर लक्ष केंद्रित करून नागरिकांना अधिक दर्जेदार नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याचा आमचा प्रयत्न आहे. मंजूर कामे निश्चित वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी प्रशासनाला आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
– अभिषेक बारणे, स्थायी समिती सभापती
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version