पिंपरी (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सोशल मीडिया अर्थातच समाजमाध्यम हे आजच्या काळातील संपर्काचे एक अद्भुत साधन आहे. चिंचवडगावातील काकडे पार्कमधील रहिवाशी असलेल्या रमेश कुलकर्णी व पुणेस्थित वैशाली क्षीरसागर यांनी दोन ते तीन महिन्यांच्या अथक परिश्रम, चिकाटी अन् अपूर्व उत्साहाच्या बळावर छत्रपती संभाजी विद्यालय, शिवनगर, तालुका कराड, जिल्हा सातारा येथील सन १९४६ ते १९६३ या कालावधीतील माजी विद्यार्थ्यांचा शोध घेऊन आपल्या शाळासोबत्यांचा व्हॉट्सॲप समूह तयार केला. त्यानंतर सातत्यपूर्ण संपर्कातून पिंपरी – चिंचवड, पुणे, कराड आणि कोल्हापूर येथे स्थायिक झालेल्या या शालेय मित्रांच्या दोन दिवसीय स्नेहमेळावा सन २०२६ चे आयोजन निसर्ग छाया, भूगाव, पुणे येथे रविवार व सोमवार दिनांक ०५ आणि ०६ एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले होते. साठ ते त्र्याऐंशी या वयोगटातील सुमारे चाळीस विद्यार्थी जेव्हा पन्नास वर्षांनंतर प्रत्यक्ष एकमेकाला भेटले; तेव्हा आपला प्रपंच अन् प्रापंचिक व्यापताप, शारीरिक व्याधी अन् वय विसरून लगेचच शालेय आठवणींमध्ये रममाण झाले. व्हॉट्सॲप ॲडमीन रामदास सूर्यवंशी आणि अरुण कुलकर्णी यांच्या उत्तम सहकार्याने नियोजित वेळेत सर्व जण स्नेहमेळाव्यात उपस्थित राहिले. सर्वांना गुलाबपुष्प अन् पेढा देऊन गोड स्वागत करण्यात आले. वेलकम ड्रिंक्सचा आस्वाद घेताघेता शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा मिळत होता. दीपप्रज्वलन, गणेशवंदना, सरस्वतीपूजन आणि सुरेल स्वागतगीताने स्नेहमेळाव्याचा प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपला परिचय, कौटुंबिक माहिती, सध्याचे वास्तव्य याविषयी माहिती देत असतानादेखील काहींनी विद्यार्थिदशेतील आपल्या खोडकर स्वभावाला जागून केलेल्या भन्नाट काॅमेंटस् सर्वांनाच खळखळून हसवत मनाचा संकोच विसरायला भाग पाडत होत्या. त्यानंतर सर्वांनी स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊन घटकाभर विश्रांती घेतली.
दुपारच्या सत्रात संगीत खुर्ची, संगीत नृत्य या खेळांमध्ये सर्वांनी हिरिरीने सहभाग घेतलाच; पण लुटुपुटुचे भांडण, रुसवेफुगवेही करीत आपल्या शालेय आनंदाची अनुभूती घेतली. अर्थातच त्यानंतर झालेल्या चहापानामुळे हे लटके रुसवे म्हणजे चह्याच्या पेल्यातील वादळाप्रमाणे आल्हाददायक ठरले. सायंकाळच्या सत्रात प्रश्नोत्तराच्या माध्यमातून योग व त्याचे महत्त्व याबाबत उपयुक्त माहिती देण्यात आली. मनोरंजक खेळांच्या सत्रात डोळे बांधून सरळ ठेवलेले प्याले न पाडता दोन्ही पायांमधून ओलांडणे, संगीतावर आधारित खेळ, फुगे फुगवून आपला दमसास तपासणे, आपण फुगवलेले फुगे सुरक्षित ठेवून चतुराईने दुसर्याचा फुगा फोडणे अशा गमतीदार क्रीडाप्रकारांनी खूप धमाल आणली. त्यानंतर शालेय आठवणी, त्या काळातील गुरुजनांनी केलेले सुसंस्कार याविषयी सर्वांनी भरभरून कृतज्ञतापूर्वक भावना व्यक्त केल्या. चित्तरंजन (दीपक) भिंताडे यांनी बहारदार सूत्रसंचालन करून सत्राची रंगत वाढवली. याप्रसंगी स्नेहमेळाव्यास उपस्थित राहिल्याबद्दल अध्यक्ष राजेंद्र नागेशकर व उपाध्यक्ष अनिल कदम यांच्या हस्ते संयोजक रमेश कुलकर्णी आणि वैशाली क्षीरसागर यांच्या वतीने प्रत्येक माजी विद्यार्थ्याला विठ्ठल – रुक्मिणीची मूर्ती तसेच त्याच्या सहचारिणीला दिव्यांचा संच स्नेहमेळाव्याच्या आठवणीचे प्रतीक म्हणून प्रदान करण्यात आले.
रात्रीच्या स्वादिष्ट भोजनानंतर गायक श्री. व सौ. अनिल कदम, श्री. व सौ. श्रीकांत आणि श्री. व सौ. विजय बिवलकर दांपत्य, सौ. भिंताडे, सौ. उज्ज्वला तारे, देवयानी पानसरे यांनी जुनी – नवी मराठी गीते ऐकवून आणि रामदास सूर्यवंशी, अधिकराव मोहिते व इतर विद्यार्थांनी विनोदी किस्से सांगून सर्वांचे मनोरंजन केले.
सोमवार, दिनांक ०६ एप्रिल रोजी सकाळी सहभागी विद्यार्थ्यांसमवेत आलेल्या जोडीदारांनी उत्स्फूर्त मनोगते व्यक्त करून अल्पोपाहाराचा आनंद द्विगुणित केला. पुन्हा भेटण्याचा मनोदय व्यक्त करीत अन् उत्साही मन:स्थितीत सर्वांनी एकमेकांचा निरोप घेतला.
