पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – थेरगाव येथील नदी प्रदूषणाच्या वाढत्या समस्येची गंभीर दखल घेत पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती अभिषेक गोविंद बारणे यांनी आज महापालिका अधिकाऱ्यांसोबत प्रत्यक्ष पाहणी केली. प्रदूषण करणाऱ्या घटकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले.
सभापती अभिषेक बारणे यांनी पर्यावरण विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि ‘ग’ क्षेत्रीय अधिकाऱ्यांसोबत थेरगाव बोट क्लब परिसराचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी नदीपात्रात साचलेला कचरा, प्रक्रीया न करता सोडले जाणारे सांडपाणी आणि औद्योगिक प्रदुषणामुळे निर्माण झालेली भीषण परिस्थिती समोर आली. या प्रदूषणामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य, शेती आणि नदीतील जैवविविधता धोक्यात आल्याबद्दल त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
या पाहणी दौऱ्यात नदी स्वच्छ ठेवण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या आणि कचरा टाकणाऱ्यांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवण्याच्या सूचनाही सभापतींनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत.
“पवना नदीचे प्रदूषण ही आपल्या सर्वांसाठी चिंतेची बाब आहे. आमदार शंकरभाऊ जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही शहराचा पर्यावरण समतोल राखण्यासाठी कटिबद्ध आहोत. नदीपात्रात कचरा टाकणाऱ्यांवर आणि बेकायदेशीरपणे सांडपाणी सोडणाऱ्यांवर आता केवळ दंड करून थांबणार नाही, तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश मी प्रशासनाला दिले आहेत. प्रशासनाकडून नदीपात्र स्वच्छतेची विशेष मोहीम तातडीने राबवण्यात येईल.”
– अभिषेक बारणे, सभापती – स्थायी समिती, पिंपरी चिंचवड महापालिका.
