रासायनिक पाण्यामुळे नागरिक हैराण; उपाय न झाल्यास विशाल काळभोर जनआंदोलनाचा इशारा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक १४, काळभोर नगर परिसरात नाल्यात रसायन मिश्रित पाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे. गेल्या दोन ते तीन वर्षांपासून या समस्येबाबत सातत्याने पाठपुरावा करूनही महापालिका प्रशासन आणि पर्यावरण विभागाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
या रसायनयुक्त पाण्यामुळे सूर्योदय अपार्टमेंट, जय टॉवर तसेच ऐश्वर्यम सोसायटी येथील रहिवाशांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांत जळजळ, खोकला, सर्दी अशा विविध आरोग्य समस्या भेडसावत आहेत. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे माजी प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी महापालिका आयुक्त, महापौर आणि पर्यावरण विभागाला निवेदन देत तातडीने या रसायन मिश्रित पाण्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास नागरिकांना सोबत घेऊन तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
