पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – संयुक्त महाराष्ट्र चळवळीचे नेते, स्वातंत्र्यसेनानी तसेच राष्ट्र सेवा दलाचे संस्थापकांपैकी एक असलेले ज्येष्ठ समाजवादी नेते एस. एम. जोशी यांच्या स्मृतिदिनानिमित्त कष्टकरी संघर्ष महासंघाच्या वतीने त्यांना अभिवादन करण्यात आले.
राजकारणात सक्रिय राहून समाजकारणाची भक्कम बाजू उभी करणारे एस. एम. जोशी हे आमदार, खासदार तसेच विधानसभेचे विरोधी पक्षनेते म्हणूनही कार्यरत होते. साधेपणा, प्रामाणिकपणा आणि तत्त्वनिष्ठ राजकारणामुळे ते “अजातशत्रू” म्हणून ओळखले जात होते.
कामगार चळवळीतही त्यांचे मोठे योगदान राहिले आहे. संरक्षण साहित्य तयार करणाऱ्या कामगारांपासून ते भांडी बनवणाऱ्या कामगारांपर्यंत विविध संघटनांचे त्यांनी नेतृत्व केले. तसेच एसटी कामगारांच्या प्रश्नांसाठीही त्यांनी सातत्याने लढा दिला.
या प्रसंगी कामगार नेते काशिनाथ नखाते, महासंघाचे उपाध्यक्ष राजेश माने, धनंजय सकट, रंजना लोखंडे, अर्चना जाधव, गयाबाई आंधळे, मीरा माळी, रेखा चौधरी, रेखा गायकवाड, बाळासाहेब कसबे, अनिल माळी आदी उपस्थित होते.
