चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने राज्यभरात मतदार याद्यांचे पुननिरीक्षण म्हणजेच ‘एसआयआर’ (SIR) अभियान अत्यंत प्रभावीपणे राबविले जात आहे. या अभियानाच्या नियोजनासाठी आणि अंमलबजावणीसाठी चिंचवड विधानसभा मतदारसंघाच्या ‘बीएलए-१’ (विधानसभा प्रमुख) पदी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे माजी सभागृह नेते नामदेव जनार्दन ढाके यांची अधिकृत नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पत्राद्वारे या निवडीची घोषणा केली असून, त्यांच्या नियुक्तीमुळे चिंचवड परिसरातील पक्ष संघटनेला मोठी ताकद मिळणार आहे.
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे की, मतदार याद्यांचे सक्षमीकरण आणि अचूकता तपासणे हे पक्षाचे अत्यंत महत्त्वाचे अभियान आहे. या मोहिमेसाठी नामदेव ढाके यांच्याकडे चिंचवड विधानसभा क्षेत्राची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. ढाके यांचा स्थानिक राजकारणातील प्रदीर्घ अनुभव आणि प्रशासकीय कामाची जाण लक्षात घेता, ते मतदार याद्यांच्या पुननिरीक्षण कामात पूर्ण वेळ देऊन आपल्या अनुभवाचा योग्य उपयोग करतील, असा विश्वास प्रदेश नेतृत्वाने व्यक्त केला आहे.
या नवीन जबाबदारीनुसार, नामदेव ढाके यांना आता चिंचवड विधानसभा मतदारसंघातील जिल्हाध्यक्ष, स्थानिक आमदार आणि वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी समन्वय साधून कामाला गती द्यावी लागणार आहे. मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर (बूथवर) ‘बीएलए-२’ (बूथ लेव्हल एजंट) च्या नियुक्त्या करणे आणि त्यांच्या माध्यमातून तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचणे, ही त्यांची मुख्य जबाबदारी असणार आहे. या नियुक्त्यांची संपूर्ण माहिती प्रदेश कार्यालयाला ईमेल आणि व्हॉट्सॲपच्या माध्यमातून कळवण्याचे निर्देशही पत्रात देण्यात आले आहेत.
आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक बूथ स्तरावर पक्षाचे जाळे मजबूत करण्यासाठी ही नियुक्ती अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. नामदेव ढाके यांच्या निवडीबद्दल चिंचवड मतदारसंघातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून, सर्व स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
