भाऊसाहेब भोईर यांचे प्रतिपादन; नटराज पूजन आणि मान्यवरांच्या उपस्थितीत रंगला सोहळा
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पिंपरी-चिंचवड शाखेतर्फे २७ मार्च रोजी ‘जागतिक रंगभूमी दिन’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहातील नटराज प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि त्यानंतर नाट्य परिषदेच्या कार्यालयात विधीवत नटराज पूजन करून रंगभूमीप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
नाट्य परिषदेचे पिंपरी-चिंचवड शाखा अध्यक्ष माननीय श्री. भाऊसाहेब भोईर यांनी यावेळी उपस्थित नाट्यकर्मी आणि रसिकांना मार्गदर्शन केले. यावेळी व्यासपीठावर सुहास जोशी, किरण येवलेकर, गौरी लोंढे, संतोष रासने, राजेंद्र बंग, मुकेश घोडके,पंकज चव्हाण, मनोज डाळींबकर, फिरोज मुजावर, जुबेर शेख यांसह सांस्कृतिक क्षेत्रातील इतर अनेक मान्यवर, रसिक प्रेक्षक उपस्थित होते.
रंगभूमीचे महत्त्व आणि जागतिक वारसा आपल्या संबोधनात भाऊसाहेब भोईर यांनी जागतिक रंगभूमी दिनाचा इतिहास सांगताना स्पष्ट केले की, “इंटरनॅशनल थिएटर इन्स्टिट्यूट (ITI) या संस्थेमार्फत १९६१-६२ सालापासून हा दिवस जगभरात साजरा केला जातो. नाटक हे केवळ मनोरंजनाचे साधन नसून समाजातील विचार, भावना आणि होणारे बदल प्रभावीपणे मांडण्याचे ते एक सशक्त माध्यम आहे. जगभरातील नाट्यकर्मी आणि प्रेक्षकांमध्ये कलेच्या विचारांची देवाणघेवाण व्हावी, हाच या दिवसाचा मुख्य उद्देश आहे.”
‘कलाकार कट्टा’ उपक्रमाचे कौतुक नाट्य परिषदेच्या कार्याचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की, “येणाऱ्या काळात नाट्य परिषदेने अधिक जोमाने काम करून नवनवीन कलाकारांना प्रोत्साहन दिले पाहिजे. जास्तीत जास्त प्रेक्षकांना पुन्हा एकदा नाट्यगृहाकडे वळवणे हे आपले ध्येय आहे. विविध कला प्रकारातील कलाकारांना एक सामायिक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी गेल्या तीन महिन्यांपासून परिषदेने सुरू केलेला ‘कलाकार कट्टा’ हा उपक्रम अत्यंत महत्त्वाचे योगदान बजावत आहे.”
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शहरातील अनेक उदयोन्मुख कलाकार आणि रंगकर्मींनी एकत्र येत रंगभूमीवरील आपल्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमाचे नियोजन आणि आभार प्रदर्शन नाट्य परिषदेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी केले.
