पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड जैन महासंघाच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही भगवान महावीर जयंती महोत्सवानिमित्त 31 मार्च रोजी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये ‘अहिंसा पुरस्कार’, अहिंसा रॅली, अहिंसा पदयात्रा आणि भक्ती संध्या अशा उपक्रमांचा समावेश आहे.
महासंघाकडून गेल्या अनेक वर्षांपासून शाकाहाराचा प्रसार करणाऱ्या व विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना ‘अहिंसा पुरस्कार’ देऊन गौरविण्यात येते. यापूर्वी अण्णासाहेब हजारे, पोपटराव पवार, डॉ. श्रीपाल सबनीस, डॉ. रामचंद्र देखणे, बाबासाहेब पुरंदरे, उल्हासदादा पवार, शेखर गायकवाड, गुरु गोविंद गिरी महाराज आदी मान्यवरांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
यावर्षी अध्यात्मिक क्षेत्रात कीर्तनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणारे ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर, वास्तुशास्त्र व समाजसेवा क्षेत्रातील योगदानाबद्दल वास्तुतज्ञ आनंद पिंपळकर, शिक्षण क्षेत्रातील कार्याबद्दल ज्ञान प्रबोधिनीचे केंद्र संचालक डॉ. मनोज देवळेकर, तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांची सेवा करणारे एम. ए. हुसेन यांची ‘अहिंसा पुरस्कार’ासाठी निवड करण्यात आली आहे.
या निवडीबाबतची माहिती पुरस्कार समितीचे प्रमुख व महासंघाचे संस्थापक अध्यक्ष डॉ. अशोक कुमार पगारिया, माजी अध्यक्ष अजित पाटील, नितीन बेदमुथा, उमेश पाटील, विलासकुमार पगारिया आणि विद्यमान अध्यक्ष श्रेयस पगारिया यांनी दिली आहे.
