पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका येथे तब्बल चार वर्षांनंतर लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्वसाधारण सभा पार पडली. विशेष म्हणजे या सभेत महापालिकेच्या अर्थसंकल्पावर सलग १४ तास जोरदार चर्चा झाली. त्यामुळे ही सभा राजकीय दृष्ट्या महत्त्वपूर्ण ठरली.
सभेचे कामकाज सकाळपासून सुरू होऊन रात्री उशिरापर्यंत चालले. विविध पक्षांच्या नगरसेवकांनी अर्थसंकल्पातील तरतुदींवर सखोल चर्चा करत प्रशासनाला धारेवर धरले. शहरातील प्रलंबित कामे, मूलभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, तसेच विकास प्रकल्प यावर सदस्यांनी आपापली मते मांडली.
रात्री सुमारे १ वाजण्याच्या सुमारास आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या समारोपाच्या भाषणाने सभेची सांगता झाली. त्यांनी सदस्यांनी मांडलेल्या सूचनांची दखल घेत पुढील नियोजनात त्यांचा विचार केला जाईल, असे आश्वासन दिले.
या सभेला महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, भाजप गटनेते प्रशांत शितोळे, शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे, स्थायी समिती अध्यक्ष अभिषेक बारणे यांच्यासह नगरसेवक राजू मिसाळ, संजय काटे, नववाथ जगताप, विनोद नढे, कुणाल वाळकुंभार, धर्मपाल तंतरपाळे आदी उपस्थित होते.
सुमारे १४ तास चाललेल्या या चर्चेमुळे अर्थसंकल्पावर सखोल विचारविनिमय झाला असून आगामी काळातील शहराच्या विकासाचा रोडमॅप अधिक स्पष्ट होणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
