Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपळे सौदागर (प्रभाग २८) येथील कुणाल आयकॉन रोडच्या सुरू असलेल्या कॉंक्रिटीकरणाच्या कामाची आज माजी विरोधी पक्षनेते विठ्ठल उर्फ नाना काटे यांनी प्रत्यक्ष पाहणी केली. या पाहणीदरम्यान रस्त्याच्या कामाचा दर्जा, गती आणि नियोजनाचा सखोल आढावा घेण्यात आला.

यावेळी कुणाल आयकॉन, शुभश्री आणि साई अवेन्यू या सोसायट्यांच्या गेटसमोर पावसाळ्यात पाणी साचण्याची समस्या लक्षात घेऊन संबंधित ठिकाणी चेंबर उभारून ते स्टॉर्म वॉटर लाईनला जोडण्याच्या सूचना देण्यात आल्या. यामुळे पावसाचे पाणी सुरळीतपणे वाहून जाण्यास मदत होणार आहे.
पाहणीवेळी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या स्थापत्य विभागाचे डेप्युटी इंजिनिअर चंद्रकांत मोरे, विद्युत विभागाच्या डेप्युटी इंजिनिअर दिपाली रेडे, स्थापत्य विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर विवेक गजपुरे, पाणीपुरवठा विभागाचे ज्युनिअर इंजिनिअर अंकुश सयाजीराव तसेच इन्फ्राकिंग कन्सल्टन्सी इंजिनियर्स प्रा. लि. चे प्रकल्प सल्लागार आर. ई. राकेश पटेल आणि T@T इन्फ्रा लिमिटेडचे प्रोजेक्ट मॅनेजर युवराज आवारे उपस्थित होते.
सदर काम पावसाळ्यापूर्वी उच्च दर्जात व वेळेत पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे अधोरेखित करत नाना काटे यांनी कामाची गती वाढविण्याचे स्पष्ट निर्देश दिले. तसेच कामादरम्यान नागरिकांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्याचेही आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

या पाहणीवेळी स्थानिक सोसायट्यांचे पदाधिकारी, सभासद व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरिकांनी मांडलेल्या समस्या व सूचनांची दखल घेत त्यावर तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन देण्यात आले.
कुणाल आयकॉन रोडचे कॉंक्रिटीकरण पूर्ण झाल्यानंतर परिसरातील वाहतूक अधिक सुरळीत होणार असून नागरिकांना सुरक्षित व दर्जेदार रस्ता उपलब्ध होणार आहे. स्थानिकांच्या दैनंदिन जीवनात सकारात्मक बदल घडवून आणणारे हे काम लवकर पूर्ण करण्यासाठी प्रशासन कटिबद्ध असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version