चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – चिंचवड येथील काशीधाम मंगल कार्यालयात वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त भव्य महिला सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. शहरातील विविध क्षेत्रांत कार्यरत असलेल्या महिलांचा यावेळी सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमात महिला सन्मानासोबतच महिला प्रबोधन आणि नेत्र आरोग्याविषयी मार्गदर्शन अशा उपयुक्त उपक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. समाज प्रबोधनकार शारदा मुंडे या प्रमुख वक्त्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी आपल्या खुमासदार शैलीत महिलांना मार्गदर्शन करत समाजातील महिलांच्या भूमिकेवर प्रकाश टाकला.
कार्यक्रमाला ईशा नेत्रालय, चिंचवड स्टेशनच्या सेंटर हेड ध्रुवशी पाटील, ज्येष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. रश्मी लोंढे तसेच पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी मनीषा माळी या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. त्यांनी अनुक्रमे नेत्र आरोग्य, उपचार सुविधा आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवांबाबत सविस्तर माहिती दिली.
फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम पार पडला. सूत्रसंचालन सहसचिव मंगला डोळे-सपकाळे यांनी केले, तर पाहुण्यांची ओळख अपर्णा कुलकर्णी यांनी करून दिली. संस्थेचे सचिव जयंत कुलकर्णी यांनी प्रास्ताविकातून संस्थेच्या विविध सामाजिक उपक्रमांचा आढावा मांडला.
वुई टुगेदर फाउंडेशनतर्फे शैक्षणिक मदत, गरजू महिलांना सहाय्य, दिव्यांगांसाठी उपक्रम तसेच गरजू रुग्णांना वैद्यकीय मदत अशा विविध सामाजिक कार्यांवरही यावेळी प्रकाश टाकण्यात आला. विशेष म्हणजे, फाउंडेशनच्या शिफारशीने अनेक रुग्णांना नेत्रोपचारासाठी मदत मिळाल्याबद्दल ईशा नेत्रालयाचे विशेष कौतुक करण्यात आले.
या सोहळ्यात १०० हून अधिक महिलांचा सत्कार करण्यात आला. तसेच ‘गिरी सिस्टर्स’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ॲम्बुलन्स चालक भगिनी आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेती दिव्यांग खेळाडू वैष्णवी जगताप हिचा विशेष सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या शेवटी खजिनदार दिलीप चक्रे यांनी उपस्थित मान्यवर आणि सहभागींचे आभार मानले. महिलांना भविष्यातही अशाच प्रकारे सहकार्य करण्याचे आश्वासन अध्यक्ष मधुकर बच्चे यांनी दिले.
