Spread the love

पिंपरी,  (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा थेट परिणाम आता भारतातील घरगुती इंधन पुरवठ्यावर होऊ लागला आहे. पुणे, पिंपरी चिंचवडसह राज्यभरात देखील आयात विस्कळीत झाल्यामुळे बाजारपेठेत गॅस सिलिंडरचा प्रचंड तुटवडा निर्माण झाला असून, विशेषतः हातावर पोट असणाऱ्या नागरिकांना लागणारा पाच किलोचा छोटा सिलिंडरही मिळेनासा झाला आहे. या संकटकाळात गरीब जनतेला दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने तातडीने रेशन कार्डावर दोन ते तीन लिटर रॉकेल उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी ऑल महाराष्ट्र रेशन धान्य दुकानदार संघटनेचे खजिनदार विजय गुप्ता यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.

त्यात विजय गुप्ता यांनी म्हटले आहे की, ‘सध्याच्या जागतिक तणावामुळे एलपीजी (LPG) गॅसच्या पुरवठा साखळीवर मोठा परिणाम झाला आहे. मध्यमवर्गीय आणि गरीब कुटुंबांना वेळेवर गॅस सिलिंडर मिळत नसल्याने त्यांच्यासमोर चुली पेटवण्याचे मोठे संकट उभे राहिले आहे. एकेकाळी स्वयंपाकासाठी मुख्य पर्याय असलेले रॉकेल आता रेशन दुकानातून जवळपास हद्दपार झाले आहे. खुल्या बाजारातही रॉकेल उपलब्ध नसल्याने लोकांच्या अडचणीत भर पडली आहे.

गॅस सिलिंडरचा तुटवडा आणि वाढत्या किमतींमुळे गरीब जनता भरडली जात आहे. पाच किलोच्या सिलिंडरची उपलब्धता नसल्याने अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी सरकारने किमान आपत्कालीन उपाय म्हणून रेशन कार्डधारकांना दरमहा २ ते ३ लिटर रॉकेलचे वाटप करणे अत्यंत गरजेचे आहे.”

त्यांनी संघटनेच्या वतीने राज्य सरकारला विनंती केली आहे की, ‘इंधन टंचाईच्या या काळात गरिबांच्या घरांतली चूल पेटती ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने पावले उचलावीत. रॉकेलचा कोटा पुन्हा सुरू केल्यास रेशन दुकानांच्या माध्यमातून सामान्यांना मोठा आधार मिळेल, असा विश्वास गुप्ता यांनी व्यक्त केला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version