पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – मोशी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज पुतळा परिसरातील सुशोभीकरण, स्थापत्य आणि विद्युत कामांच्या सुमारे ५० कोटी रुपयांच्या निविदा प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात शिवसेना उपनेत्या, नगरसेविका, स्थायी समिती सदस्या सुलभा रामभाऊ उबाळे यांनी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त आणि स्थायी समिती सभापती यांना निवेदन देऊन सदर निविदा रद्द करून फेरतपासणी करण्याची मागणी केली आहे.
उबाळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज हे शिवभक्तांच्या अस्मितेचे प्रतीक असून त्यांच्या स्मारकाचे काम अत्यंत पारदर्शक आणि दर्जेदार पद्धतीने होणे आवश्यक आहे. मात्र या प्रकल्पाच्या निविदेत अनेक संशयास्पद बाबी आढळत असल्याचे त्यांनी नमूद केले आहे.
निविदा प्रक्रियेत केवळ दोनच ठेकेदारांनी सहभाग घेतल्यामुळे निकोप स्पर्धेचा अभाव दिसून येत असून ‘रिंग’ झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. शहरातील इतर विकासकामांच्या निविदा कमी दराने येत असताना या कामासाठी निविदा दरापेक्षा कमी दर सादर करण्यात आलेला नसल्याचेही निवेदनात म्हटले आहे.
तसेच या कामासाठी वापरण्यात आलेले दर विश्लेषण (रेट अॅनालिसिस) चुकीचे असण्याची शक्यता असून साहित्याचे दर बाजारभावापेक्षा जास्त दाखवून अंदाजपत्रक फुगवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे महापालिकेचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, असेही त्यांनी म्हटले आहे.
याशिवाय निविदेत अनावश्यक कामे व वस्तूंचा समावेश करून प्रकल्पाची रक्कम वाढवण्यात आल्याचा तसेच कामाच्या प्रमाणात (क्वॉन्टिटी) प्रत्यक्ष गरजेपेक्षा जास्त आकडे दाखवण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकल्पाची तांत्रिक मान्यता आणि दर विश्लेषणाची तज्ज्ञ समितीमार्फत सखोल चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, सदर निविदा तातडीने रद्द करून नव्याने पारदर्शक निविदा प्रक्रिया राबवावी, अन्यथा या प्रकरणात लोकशाही मार्गाने आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उबाळे यांनी दिला आहे.
