Spread the love

 

रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी महाराष्ट्र शासनाचे ॲप सुरू करण्यासाठीही प्रयत्न

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्रातील रिक्षा व टॅक्सी चालकांच्या कल्याणासाठी स्थापन करण्यात आलेल्या धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाला गती देण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे, असे आश्वासन राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले. तसेच रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी राज्य शासनाचे स्वतंत्र ॲप विकसित करण्याचे काम सुरू असून ते लवकरच सुरू करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील रिक्षा चालकांच्या विविध प्रश्नांसंदर्भात कामगार नेते काशिनाथ नखाते यांनी आज विधान भवन मुंबई येथे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची भेट घेऊन निवेदन दिले. यावेळी रिक्षा-टॅक्सी चालकांच्या समस्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

रिक्षा चालकांच्या अनेक वर्षांच्या प्रयत्नातून धर्मवीर आनंद दिघे रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाची स्थापना झाली आहे. मात्र या महामंडळात नोंदणी करणाऱ्या चालकांची संख्या कमी असल्याने ती वाढवण्यासाठी विशेष अभियान राबवावे, अशी मागणी नखाते यांनी केली. तसेच राज्य शासनाचे ॲप सुरू करून त्यातून मिळणारा लाभांश महामंडळाकडे दिल्यास रिक्षा चालकांना सामाजिक सुरक्षा आणि विविध योजनांचा लाभ देणे अधिक सुलभ होईल, असे म्हणाले.

या भेटीदरम्यान रिक्षा चालकांचे खुले परमिट बंद करण्याचा निर्णय घेतल्याबद्दल नखाते यांनी रिक्षा चालकांतर्फे परिवहन मंत्र्यांचे आभारही मानले. यावेळी रिक्षा-टॅक्सी चालकांसाठी तयार करण्यात येणाऱ्या शासकीय ॲपमधून मिळणारा निधी चालकांच्या कल्याणासाठी वापरण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला. तसेच महामंडळात नोंदणीसाठी आकारले जाणारे ८०० असल्याने नोंदणीचे प्रमाण अत्यल्प असून हे शुल्क कमी करण्याचा निर्णय झाल्यास नोंदणी मोठ्या प्रमाणात होऊ शकते आणि ॲपमधून मिळणाऱ्या निधीतून त्यासाठी मदत करण्याबाबतही चर्चा करण्यात आली.

तसेच महामंडळाच्या नोंदणीला चालना देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात कार्यालय स्थापन करणे, रिक्षा चालकांना विमा संरक्षण देणे, कर संबंधी अडचणी सोडवणे आणि चालकांच्या विविध समस्यांवर सकारात्मक निर्णय घेण्याबाबतही चर्चा झाली.

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील रिक्षा चालकांनी मोठ्या प्रमाणात महामंडळात सहभागी होऊन नोंदणी करावी, असे आवाहन केले. राज्य शासनाचे ॲप विकसित करण्याचे काम सुरू असून ते लवकरच सुरू करण्यात येईल आणि रिक्षा-टॅक्सी चालक महामंडळाला अधिक गती देण्यासाठी शासन प्रयत्न करेल, असे त्यांनी आश्वासन दिले.

राजू बोराडे, गुरु बडदाळे, शामशुद्दीन शेख, रोहन मुरगुंड, सुभाष वाशीमकर,रामभाऊ कांबळे,दिनकर खांडेकर, मनोज घोडके,रवी चव्हाण, मंगेश पालके, संजय शिंगे, रामा बिराजदार, अतिश वडमारे सुनील चौरे,शैलेंद्र चव्हाण आदी मंडळासाठी प्रयत्नशील आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version