मुंबई, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – औंध येथील जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयाची वाढती गरज लक्षात घेता या रुग्णालयाचे ३० खाटांवरून ५० खाटांपर्यंत उन्नतीकरण करण्यात यावे तसेच रुग्णांसाठी आवश्यक औषधे आणि आधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी विधान परिषदेत पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशनद्वारे आमदार उमा खापरे यांनी मांडली.
औंध परिसरासह पुणे शहर आणि उपनगरातील नागरिक आयुर्वेद, योग, नैसर्गिक चिकित्सा, युनानी आणि होमिओपॅथी अशा आयुष पद्धतींच्या उपचारांसाठी या रुग्णालयावर अवलंबून आहेत. मात्र रुग्णसंख्या वाढत असताना सध्या उपलब्ध असलेल्या ३० खाटांची क्षमता अपुरी पडत असल्याचे आमदार खापरे यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले.
रुग्णालयात अधिक खाटा उपलब्ध झाल्यास अधिक रुग्णांना उपचार मिळू शकतील तसेच आवश्यक औषधसाठा व आधुनिक वैद्यकीय यंत्रसामग्री उपलब्ध करून दिल्यास उपचार व्यवस्था अधिक सक्षम होईल, असेही त्यांनी सांगितले.
या पार्श्वभूमीवर औंध येथील जिल्हा एकात्मिक आयुष रुग्णालयाचे ५० खाटांच्या रुग्णालयात उन्नतीकरण करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी आमदार उमा खापरे यांनी सभागृहात केली.
