पिंपरी,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – मराठी भाषा गौरव दिनाचे औचित्य साधून मराठवाडा जनविकास संघ, पिंपरी चिंचवड व शारदा प्रतिष्ठान भालकी, बिदर यांच्या संयुक्तपणे सीमावर्ती भागातील भालकी तालुक्यातील (जि. बिदर) अट्टरगा, गुंजरगा, माणकेश्वर आणि बसवनवाडी येथील सहकारी प्राथमिक शाळांमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला ग्रामस्थांचा आणि मराठी प्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
‘अभिमान मराठीचा, उत्सव मराठी भाषेचा’, या ब्रीदवाक्याला सार्थ ठरवत सीमावर्ती भागातील मराठी शाळांना आणि शिक्षकांना त्यांच्या अमूल्य योगदानाबद्दल ‘सन्मान चिन्ह’ देऊन गौरविण्यात आले. तसेच मराठी भाषेचे महत्त्व आणि संवर्धन या विषयावर प्रबोधनात्मक व्याख्यान, विद्यार्थ्यांमध्ये मराठी साहित्याबद्दल जनजागृती करण्यात आली. भारताचे संविधान, ज्ञानेश्वरी, संत तुकाराम महाराज गाथा, तसेच शैक्षणिक साहित्य भेट म्हणून देण्यात आले. यावेळी मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार, शारदा प्रतिष्ठानचे विश्वस्त डॉ. दिनकर मोरे, ह.भ.प. बब्रुवाहन वाघ महाराज, सूर्यकांत कुरुलकर, दत्तात्रय धोंडगे, प्रा. रत्नाकर खांडेकर, सुधाकर थिटे, किशोर अट्टर्गेकर, तुकाराम मोरे, हरिदेव रुद्रमणी, तुकाराम शेडोळे, अमृत अक्रे आदी उपस्थित होते.
याबाबत बोलताना मराठवाडा जनविकास संघाचे अध्यक्ष अरुण पवार म्हणाले, की मराठी आपली मायबोली आहे आणि ती सातासमुद्रापार नेण्यासोबतच सीमावर्ती भागात जीवंत ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. हा छोटासा प्रयत्न त्याच संकल्पाचा एक भाग आहे.
