Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २२ मधील काळेवाडी-विजयनगर परिसरात गेल्या काही आठवड्यांपासून नागरिकांना दूषित व गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर माजी विरोधी पक्षनेते मच्छिंद्र भाऊसाहेब तापकीर यांनी महापालिका आयुक्तांकडे लेखी निवेदन देत तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, काळेवाडी-विजयनगर, पद्मानगर, आदर्शनगर, काळेवाडी स्मशानभूमी परिसर, आश्रयी कॉलनी, सहकार कॉलनी, आजाद कॉलनी, काळेवाडी गावठाण परिसर तसेच ज्योतिबानगर या भागांमध्ये दूषित आणि गढूळ पाण्याचा पुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी असून अनेक तक्रारी समोर येत आहेत.
दूषित पाण्यामुळे नागरिकांना ताप, उलटी, जुलाब यांसारख्या साथीच्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या परिसरातील अनेक नागरिक आजारी पडत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे स्वच्छ आणि सुरक्षित पाणीपुरवठा तातडीने सुरू करावा, अशी मागणी तापकीर यांनी केली आहे.

तसेच सात दिवसांच्या आत पाणीपुरवठा सुरळीत व स्वच्छ करण्यात आला नाही, तर काळेवाडी-विजयनगर परिसरातील महिलांच्या सहकार्याने महापालिकेवर ‘हंडा मोर्चा’ काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रश्नाची गंभीर दखल घेऊन संबंधित अधिकाऱ्यांना तात्काळ निर्देश देण्याची मागणी तापकीर यांनी केली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version