Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य शासनाने पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आयुक्तपदी आयएएस अधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांची नियुक्ती केली आहे. महापालिकेचे प्रभारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी तातडीने पदभार त्यांच्याकडे सोपविण्याचे आदेश सामान्य प्रशासन विभागाचे सहसचिव सुभाष उमराणीकर यांनी दिले आहेत.

डॉ. सूर्यवंशी हे २००६ च्या बॅचचे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी आहेत. त्यांचे शालेय शिक्षण सातारा सैनिक स्कूल तसेच नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. पुढे त्यांनी पीएच.डी. (व्यवस्थापन), एमबीए (मार्केटिंग), एलएलबी आणि बीएससी (फिजिक्स) असे शिक्षण पूर्ण केले आहे. ९ मार्च २०१२ रोजी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) येथे सह-मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी प्रशासकीय सेवेत प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी राज्यातील अनेक महत्त्वाच्या पदांवर काम करत प्रभावी प्रशासनाची छाप पाडली.

जिल्हा परिषद कोल्हापूर व पालघर येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून त्यांनी ग्रामीण विकासाच्या विविध योजनांना गती दिली. त्यानंतर गोंदिया आणि रायगड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना प्रशासनातील पारदर्शकता व विकास प्रकल्पांची प्रभावी अंमलबजावणी केली. तसेच कल्याण-डोंबिवली महापालिकेचे आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) येथे अतिरिक्त आयुक्त, तसेच महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त म्हणूनही त्यांनी जबाबदारी सांभाळली. कोकण विभागीय आयुक्त म्हणून कार्यरत असताना विभागातील प्रशासन सुसूत्र करण्याबरोबरच विविध विकास योजनांवर त्यांनी विशेष भर दिला.

अखेर श्रावण हर्डीकर यांचा पदभार काढला
महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची शासनाने नाशिक कुंभमेळा येथे बदली केली होती. त्यानंतर त्यांच्या जागेवर महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांच्याकडे कार्यभार देण्यात आला होता. निवडणुकीनंतर पूर्णवेळ आयुक्त मिळावेत, अशी मागणी नगरसेवक सातत्याने करत होते. शहराचा वेगाने होत असलेला विस्तार, पायाभूत सुविधा, मेट्रो प्रकल्प, रस्ते विकास, पर्यावरणीय प्रश्न आणि वाढती लोकसंख्या या पार्श्वभूमीवर नवीन आयुक्तांसमोर मोठी प्रशासकीय आव्हाने असणार आहेत.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version