अडथळा निर्माण झाल्यास पिंपरी चिंचवड शहर अंधारात जाण्याची शक्यता?..
आयुक्तांच्या निदर्शनास आणली बाब…
पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – बिजलीनगर ते रुपीनगर दरम्यान महावितरणच्या उच्च क्षमतेच्या टॉवर लाईनखाली उंच झाडांची लागवड करण्यात आल्याने सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला असून या प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समितीचे पुणे जिल्हा सदस्य तथा शिवसेना पुणे जिल्हा संघटक संतोष रमाकांत सौंदणकर यांनी पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे नुकतीच केली आहे.
याबाबत सौंदणकर यांनी आयुक्तांना निवेदन दिले आहे. या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, ‘प्राधिकरण परिसरातील काच घर चौक ते भक्ती शक्ती चौक या दरम्यान महावितरणची उच्च क्षमतेची टॉवर लाईन गेली आहे. मात्र याच लाईनखाली महापालिकेच्या वतीने पाम ट्रीसारखी उंच वाढणारी झाडे लावण्यात आली आहेत. भविष्यात झाडांची वाढ झाल्यास ती टॉवर लाईनला अडथळा निर्माण करू शकतात. अशा परिस्थितीत सुरक्षेच्या कारणास्तव महापारेषणकडून झाडे तोडण्याच्या सूचना दिल्या जाऊ शकतात.
महापालिकेने मोठ्या खर्चाने लावलेली झाडे पुन्हा तोडावी लागल्यास सार्वजनिक निधीचा अपव्यय होण्याची शक्यता आहे. तसेच टॉवर लाईनखाली झाडे असल्यास ती तोडताना अपघात किंवा जीवितहानी होण्याचाही धोका असल्याचे सौंदणकर यांनी निवेदनात नमूद केले आहे.
याशिवाय सुशोभीकरणासाठी कमी उंचीची झाडे लावणे अपेक्षित असताना उंच वाढणाऱ्या झाडांची लागवड का करण्यात आली, याची चौकशी होणे आवश्यक असल्याचे त्यांनी म्हटले आहे. या प्रकरणात महापालिकेच्या उद्यान विभागामार्फत ठेकेदारांना लाभ देण्याचा प्रकार झाला आहे का, याचीही चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
“उच्च क्षमतेच्या टॉवर लाईनखाली उंच झाडांची लागवड करणे ही अत्यंत धोकादायक बाब आहे. भविष्यात झाडे वाढल्यास विजपुरवठ्यावर परिणाम होऊ शकतो आणि शहर अंधारात जाण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणाची तातडीने चौकशी करून जबाबदार अधिकारी आणि संबंधित ठेकेदारांवर कडक कारवाई करण्यात यावी.”
मा. संतोष सौंदणकर, (महाराष्ट्र राज्य विद्युत सनियंत्रण समिती, पुणे जिल्हा – सदस्य तथा शिवसेना, पुणे जिल्हा संघटक)…
