Spread the love

 

​पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील शालेय विद्यार्थ्यांमधील सुप्त क्रीडा गुणांना वाव देण्यासाठी अत्यंत लोकप्रिय ठरलेली ‘आंतरशालेय महापौर चषक टीन-२० स्पर्धा’ पुन्हा आयोजित करण्यात यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराच्या वतीने महापौर रवी लांडगे, क्रीडा सभापती कैलास कुटे आणि महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना गुरुवारी विशेष निवेदन देण्यात आले. शहराला क्रीडा क्षेत्राचा मोठा वारसा लाभलेला असून, महापालिकेतर्फे आयोजित केल्या जाणाऱ्या या स्पर्धेमुळे उदयोन्मुख खेळाडूंना आपले कौशल्य दाखवण्याची मोठी संधी मिळत असे. मात्र, सन २०१९ मध्ये ही स्पर्धा शेवटची घेण्यात आली होती आणि त्यानंतर ती प्रलंबित असल्याने शालेय खेळाडूंमध्ये निराशेचे वातावरण आहे.
​या निवेदनाद्वारे भाजयुमोने प्रशासनाचे लक्ष वेधताना स्पर्धेचे तातडीने पुनरुज्जीवन करण्याची मागणी केली आहे. स्पर्धेचे व्यापक नियोजन करून शहरातील सर्व खाजगी व महानगरपालिका शाळांना यामध्ये सहभागी करून घेऊन स्पर्धेची व्याप्ती वाढवावी, असेही यात नमूद करण्यात आले आहे. तसेच स्पर्धेसाठी येणाऱ्या खेळाडूंना उत्तम दर्जाची मैदाने, पिण्याचे पाणी आणि इतर आवश्यक सोयीसुविधा महापालिकेमार्फत उपलब्ध करून देणे गरजेचे असल्याचे सांगण्यात आले. यासोबतच खेळाडूंना क्रीडा शिष्यवृत्ती देणे आणि शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या खेळाडूंना प्रोत्साहनपर मानधन देण्याबाबतही या निवेदनात विशेष आग्रही मागणी करण्यात आली आहे.

​शालेय वयातच विद्यार्थ्यांना खेळाची ओढ लागल्यास भविष्यात शहरातून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे दर्जेदार खेळाडू तयार होतील, असा विश्वास शिष्टमंडळाने व्यक्त केला. प्रशासनाने या मागणीची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती यावेळी करण्यात आली. या प्रसंगी भाजपा युवा मोर्चा पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष दिनेश यादव, युवा मोर्चा प्रदेश सचिव अजित कुलथे, यांच्यासह प्रसाद कस्पटे, दिनेश काटे, राहुल खाडे, साची दोशी, राजेश डोंगरे, मनोज घोडेकर, अजय भोंडवे, जालिंदर काटे, मयूर काळभोर, गौरव शिरुडे, हेमंत देवकुळे, शरद भालेकर, आशिष राऊत, कृष्णा कदम, अभिजीत बागुल, अजय मोरे, सचिन उदागे, नितीन साळी, राजेश चौधरी, प्रतीक रामगुडे, ऋषिकेश भालेकर, प्रदीप पवार, शंतनु चौधरी, साईराज भालेकर, ओंकार पवार, प्रतिक तळेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version