Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – “पुरस्कार हा केवळ एखाद्या व्यक्तीचा सन्मान नसून त्याने आयुष्यभर जपलेल्या मानवी मूल्यांचा, कष्टांचा आणि सामाजिक योगदानाचा सार्वजनिक गौरव असतो. पिंपरी-चिंचवड हे आज केवळ उद्योगांचे शहर राहिले नसून वैचारिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध झालेले शहर आहे,” असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व माजी साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांनी केले.

मुख्य संपादक अविनाश कांबीकर यांच्या वतीने आयोजित ‘पिंपरी-चिंचवड सन्मान सोहळा २०२६’ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी शहराचे नवनियुक्त महापौर रवि लांडगे, स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, जेजुरी देवस्थानचे मुख्य विश्वस्त अनिल सौंदडे, पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजन लाखे आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी नवनियुक्त महापौर रवि लांडगे, विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर, उपमहापौर शर्मिलाताई बाबर आणि स्थायी समिती सभापती अभिषेक बारणे यांचा विशेष सत्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते ‘न्यूज १४ लाइव्ह’च्या वतीने करण्यात आला.

डॉ. सबनीस पुढे म्हणाले की, प्रत्येक शहराला एक स्वतंत्र चरित्र असते. हे चरित्र केवळ इमारतींनी किंवा विकासकामांनी तयार होत नाही, तर विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्ती त्यात वेगवेगळे रंग भरत असतात. पिंपरी-चिंचवड शहराने अशा कर्तृत्ववान व्यक्तींना नेहमीच उचलून धरले असून शहराच्या यशात सर्वच क्षेत्रातील नागरिकांचा सहभाग आहे. सध्याच्या राजकीय वातावरणात तिरस्कार वाढताना दिसत असला तरी अशा सकारात्मक पुरस्कार सोहळ्यांमुळे समाजात प्रेरणादायी वातावरण निर्माण होते, असेही त्यांनी नमूद केले.

कष्टकऱ्यांच्या घामातून शहराची उभारणी : महापौर लांडगे

नवनियुक्त महापौर रवि लांडगे यांनी शहराच्या जडणघडणीचा आढावा घेताना सांगितले की, पिंपरी-चिंचवड हे शहर कष्टकरी आणि प्रामाणिक नागरिकांच्या श्रमातून उभे राहिले आहे. मोठ्या नावांच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष जमिनीवर काम करणाऱ्या कार्यकर्त्यांचा शोध घेऊन त्यांचा सन्मान करण्याचे काम अविनाश कांबीकर आणि त्यांच्या टीमने केले आहे. तसेच लवकरच प्रवासवर्णनावर आधारित पुस्तक लिहिण्याचा मानस असून त्याची प्रस्तावना डॉ. श्रीपाल सबनीस यांनी लिहावी, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.

सांस्कृतिक शहर घडवण्याचे स्वप्न : भोईर

विरोधी पक्ष नेते भाऊसाहेबजी भोईर यांनी पिंपरी-चिंचवडच्या सांस्कृतिक चळवळीचा उल्लेख करताना सांगितले की, हे शहर केवळ कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाऊ नये, तर कलेचे आणि संस्कृतीचे केंद्र म्हणूनही विकसित व्हावे, हे आमचे स्वप्न आहे. पत्रकार म्हणून कार्य करत असताना चित्रपट निर्मिती आणि सन्मान सोहळ्याचे आयोजन करून अविनाश कांबीकर यांनी दाखवलेले धाडस कौतुकास्पद आहे, असेही त्यांनी नमूद केले.

विविध क्षेत्रांतील मान्यवरांचा सन्मान

पुरस्कार निवड समितीचे अध्यक्ष राजन लाखे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना ‘पिंपरी-चिंचवड सन्मान’ प्रदान करण्यात आला. यामध्ये अथर्व अभय कुलकर्णी (कला व संगीत), अरुण पुराणिक (पर्यावरण संवर्धन), डॉ. राजेंद्र काकंरिया (साहित्य व शिक्षण), अनिल मित्तल (उद्योजक व सामाजिक कार्य), संतोष खवळे (कृषी क्षेत्र), कृष्णा ढोकले (गिर्यारोहण व साहसी क्रीडा), श्लोक ताम्हाणे (कुस्ती), श्रीकांत चौगुले (निवेदक व लेखन), पांडुरंग वाघमारे (शैक्षणिक क्षेत्र) आणि प्रद्योत पेंढारकर (सांस्कृतिक व चित्रपट क्षेत्र) यांचा समावेश होता.

‘MPSC बॉईज’ चित्रपटाची घोषणा

याच सोहळ्याचे औचित्य साधून ब्लॅक हॉर्स मोशन पिक्चर्स निर्मित आणि अविनाश कांबीकर दिग्दर्शित ‘MPSC बॉईज’ या आगामी चित्रपटाचे पोस्टर अनावरण करण्यात आले. स्पर्धा परीक्षांसाठी झटणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संघर्षाची कथा या चित्रपटातून मांडली जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या वेळी प्रस्ताविकात अविनाश कांबीकर यांनी सांगितले की, ‘पिंपरी-चिंचवड सन्मान’ पुरस्कार सोहळ्याचे हे तिसरे वर्ष असून ‘न्यूज १४ लाइव्ह’च्या माध्यमातून शहरातील जनतेच्या हिताच्या, निपक्षपाती आणि वस्तुनिष्ठ बातम्या देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. भविष्यातही अशा प्रकारचे सन्मान सोहळे अधिक भव्य आणि दिमाखदार पद्धतीने आयोजित केले जातील. अल्पावधीतच ‘न्यूज १४ लाइव्ह’ला शहरातील नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत असल्याचेही त्यांनी नमूद केले.

तसेच यावेळी आंतरराष्ट्रीय पारितोषिक विजेता अविनाश कांबीकर दिग्दर्शित ‘सुलतान’ या लघुपटाचे विशेष प्रदर्शन पत्रकार बांधवांसाठी करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गिरीश वाघमारे यांनी केले, तर तानाजी साठे यांनी आभार मानले. या सोहळ्यास शहरातील राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version