Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढत्या तापमानामुळे उष्मालाटेचा धोका निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन केले आहे. उष्णतेमुळे होणारे आजार आणि उष्माघात टाळण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

नागरिकांनी दिवसातून पुरेसे पाणी प्यावे, तहान लागली नसली तरीही ठराविक वेळाने पाणी घेत राहावे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री किंवा टोपीचा वापर करावा. विशेषतः दुपारी १२ ते ३ या वेळेत घराबाहेर जाणे टाळावे. हलकी व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत तसेच प्रवास करताना पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सूचित करण्यात आले आहे.
उन्हात काम करणाऱ्या नागरिकांनी टोपी, छत्री किंवा ओल्या कपड्याने डोके, मान आणि चेहरा झाकावा. शरीरातील पाण्याची कमतरता टाळण्यासाठी ओआरएस, लिंबूपाणी, ताक, लस्सी किंवा कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा, डोकेदुखी, चक्कर येणे किंवा सतत घाम येणे अशी उष्माघाताची लक्षणे दिसल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.

तसेच घर थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करावा. कामाच्या ठिकाणी थंड पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असावी आणि शक्यतो पहाटेच्या वेळेत कामाचा निपटारा करावा. गरोदर महिला, लहान मुले आणि आजारी व्यक्तींची विशेष काळजी घ्यावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.
याशिवाय उन्हात अतिकष्टाची कामे करणे टाळावे. दारू, चहा, कॉफी आणि कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे. लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये तसेच गडद व जाड कपडे वापरणे टाळावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उष्णतेच्या वाढत्या तीव्रतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी या सूचनांचे पालन करून स्वतःचे व कुटुंबियांचे आरोग्य सुरक्षित ठेवावे, असे आवाहन पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने केले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version