पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पात उद्योग, गुंतवणूक आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी केलेल्या घोषणांचे स्वागत करण्यात आले असून हा अर्थसंकल्प औद्योगिक विकासाला चालना देणारा असल्याची प्रतिक्रिया पिंपरी-चिंचवड लघुउद्योग संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे यांनी दिली आहे.
राज्य सरकारने जाहीर केलेले उद्योग, गुंतवणूक आणि सेवा धोरण २०२५ हे राज्याच्या औद्योगिक वाढीसाठी महत्त्वाचे पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या धोरणाच्या माध्यमातून प्रत्येक जिल्ह्यात मोठे औद्योगिक क्लस्टर उभारण्याचा निर्णय घेतला असून २०४७ पर्यंत राज्याच्या उत्पन्नामध्ये उद्योगांचा वाटा ३० टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा उद्देश आहे. ‘इन्वेस्ट महाराष्ट्र’ नावाचे डिजिटल प्लॅटफॉर्म विकसित करण्याची घोषणा तसेच प्रत्येक जिल्ह्यात लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन करण्याचा निर्णयही स्वागतार्ह असल्याचे त्यांनी नमूद केले. या धोरणामुळे सुमारे पाच दशलक्ष रोजगार निर्मितीची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.
तसेच सूक्ष्म आणि लघुउद्योगांसाठी स्वतंत्र आयुक्तालय स्थापन करण्याचा निर्णयही महत्त्वाचा असल्याचे बेलसरे यांनी सांगितले. मात्र या घोषणांची प्रभावी अंमलबजावणी होणे गरजेचे असून पुरवठा साखळीत कार्यरत असलेल्या सूक्ष्म व लघुउद्योगांनाही याचा प्रत्यक्ष लाभ मिळायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
सूक्ष्म व लघुउद्योगांना कर्जपुरवठा करण्याच्या घोषणेचेही त्यांनी स्वागत केले. मात्र बँका आणि वित्तीय संस्थांकडून उद्योगांना सहजपणे कर्ज उपलब्ध होईल याची जबाबदारी सरकारने घ्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सूक्ष्म व लघुउद्योगांसाठी स्वतंत्र विभाग किंवा कमिशनर कार्यालय कार्यरत झाल्यास उद्योगांचा विकास वेगाने होईल, त्यांची वार्षिक उलाढाल वाढेल आणि राज्याच्या आर्थिक विकासालाही चालना मिळेल, असे ते म्हणाले.
याशिवाय स्टार्टअप उद्योगांसाठी ‘महाफंड’ निर्माण करून त्यांना वित्तीय कर्जपुरवठा सुलभ केल्यास नवउद्योजकांना प्रोत्साहन मिळेल आणि रोजगारनिर्मितीला गती मिळेल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
