Spread the love

देहू, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या नामगजराने गुरुवारी देहूनगरी दुमदुमली. भजनी दिंड्यांनी रात्रभर केलेला जागर, काकडा आरती, महापूजा, हरिपाठ, वीणा, टाळ, मृदंग, चिपळ्यांची साथ, हरिनामाचा गजर आणि भाविकांची अलोट गर्दी अशा भक्तिमय वातावरणात ३७८ वा बीज सोहळा झाला. दुपारी बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून आणि मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे आजच्या दिवशी सदेह वैकुंठगमन झाले. त्यामुळे हा दिवस तुकाराम बीज म्हणून ओळखला जातो. देहूनगरीत या दिव्य सोहळ्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी दाखल झाले होते. पहाटे तीन वाजता मुख्य देऊळवाड्यात काकडा आरती झाली. पहाटे चार वाजता देऊळवाड्यातील विठ्ठल-रुक्मिणी पूजा, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरातील, वैकुंठगमन स्थान येथील पूजा संस्थानाचे अध्यक्ष जालिंदर महाराज मोरे आणि विश्वस्तांच्या हस्ते झाल्या. विश्वस्त लक्ष्मण महाराज मोरे, उमेश महाराज मोरे, वैभव महाराज मोरे, दिलीप महाराज मोरे, गणेश महाराज मोरे, विक्रमसिंह महाराज मोरे या वेळी उपस्थित होते.

सकाळी साडेदहा वाजता हरीनामच्या गजरात पालखीचे वैकुंठस्थान मंदिराकडे प्रस्थान झाले. त्यानंतर वैकुंठगमन सोहळ्यात देहूकर महाराजांचे वैकुंठगमन प्रसंगावर कीर्तन झाले. साडेअकरा वाजता पालखीची वैकुंठगमन मंदिराला प्रदक्षिणा झाली. दुपारी बारापर्यंत तुकोबारायांच्या नामाचा, विठ्ठलाच्या नामाचा गजर झाला. बारा वाजता नांदुरकीच्या वृक्षावर फुलांची उधळण करून, मनोभावे हात जोडत भाविकांनी इंद्रायणीच्या काठी भक्तिचैतन्य फुलविले. दुपारी साडेबारा वाजता वैकुंठस्थान येथून पालखीचे मुख्य देऊळवाड्यातील मंदिराकडे आगमन झाले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची अलोट गर्दी झाली होती.

वडिवळे धरणातून इंद्रायणी नदीत विसर्ग करण्यात आला आहे. त्यामुळे ती दुथडी भरून वाहत आहे. हजारो भाविकांनी मुख्य देऊळवाड्यात दर्शनासाठी जाण्यापूर्वी इंद्रायणी नदीत स्नान केले. त्यानंतर भाविकांनी दर्शनबारीतून विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम महाराज शिळा मंदिरात दर्शन घेतले. मुख्य देऊळवाड्यात आणि वैकुंठस्थान मंदिरात पहाटेपासून भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती.

कडेकोट पोलीस बंदोबस्त
भाविकांच्या सुरक्षिततेसाठी संत तुकाराम महाराज देऊळवाडा आणि वैकुंठ गमन स्थान मंदिरात पोलिसांनी चोख बंदोबस्त तैनात ठेवला होता. गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्यांना थोपविण्यासाठी खास पोलीस पथक तैनात करण्यात आले होते. इंद्रायणी नदीत पाणी सोडण्यात आल्यामुळे पाण्याची पातळी वाढल्याने कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, म्हणून स्थानिक जीवरक्षकांचे पथक तैनात करण्यात आले होते. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चाकण, तळेगाव, देहूफाटा मार्गाने देहूत येणारी वाहतूक इंद्रायणी नदीवरून बंद करण्यात आली होती. आळंदीमार्गे येणारी वाहतूक विठ्ठलवाडी येथे थांबविली होती.

 

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version