पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) — पिंपरी चिंचवड महानगरपालिका मधील स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या भाजपच्या निष्ठावान कार्यकर्ते पोपट हजारे यांची दावेदारी सध्या शहराच्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरत आहे. गेली वीस वर्षे भारतीय जनता पार्टी मध्ये तळागाळातील कार्यकर्त्यापासून ते शहर पदाधिकारी स्तरापर्यंत विविध जबाबदाऱ्या सांभाळत त्यांनी पक्षसंघटनेत सक्रिय भूमिका बजावली आहे.
नियोजन, संयोजन, मोर्चे, आंदोलने, जाहीर सभा तसेच विविध पक्षीय कार्यक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. ‘मन की बात’सह केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजना नागरिकांपर्यंत पोहोचवण्याचे काम त्यांनी सातत्याने केले आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ च्या विधानसभा निवडणुका तसेच २०१७ आणि २०२६ च्या महापालिका निवडणूक प्रचारात जाहीर सभांमधून पक्षाची भूमिका आणि उमेदवारांचे विचार प्रभावीपणे मांडले. प्रचाराच्या काळात पालिकेमध्ये अहोरात्र धुरा सांभाळल्याचेही सांगितले जाते.
हजारे हे धनगर समाजातून येत असून शहरातील धनगर समाज एकत्रित करून भाजपच्या प्रवाहात आणण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. भोसरी विधानसभा मतदारसंघात धनगर समाजाला अद्याप प्रतिनिधित्व मिळाले नसल्याची भावना व्यक्त होत असून, त्यामुळे आमदार महेश लांडगे व पक्षश्रेष्ठी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील, अशी चर्चा कार्यकर्त्यांमध्ये आहे.
व्यवसायाने ते टाटा मोटर्स कंपनीत कार्यरत असून, टाटा मोटर्स कर्मचारी पतसंस्थेचे संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहराची औद्योगिक जीवनवाहिनी मानल्या जाणाऱ्या टाटा मोटर्समधील मोठा कर्मचारी वर्ग शहरात वास्तव्यास असल्याने भविष्यात त्याचा राजकीय फायदा पक्षाला होऊ शकतो, असेही जाणकारांचे मत आहे.
यापूर्वी त्यांच्या पत्नीने महापालिकेच्या निवडणुकीसाठी तिकीट मागितले होते. त्यावेळी वरिष्ठांकडून “योग्य वेळी विचार केला जाईल” असे आश्वासन देण्यात आले होते. त्यामुळे यंदा स्वीकृत नगरसेवक पदासाठी पोपट हजारे यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
दरम्यान, या पदाबाबत पक्षश्रेष्ठी आणि वरिष्ठ नेतेमंडळी कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
