पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – कोरोना काळात नागरिकांच्या नोकऱ्या, उद्योग व व्यवसायांवर मोठा परिणाम झाला होता. आर्थिक स्थिती ढासळलेल्या अनेक नागरिकांवर महापालिकेच्या मालमत्ता करावरील व्याजाचा अतिरिक्त बोजा पडला होता. या पार्श्वभूमीवर व्याजमाफीसाठी ‘अभय योजना’ राबविण्याची मागणी करण्यात आली होती.
सामाजिक कार्यकर्ते विशाल काळभोर यांनी ३१ जानेवारी २०२५ रोजी महापालिका आयुक्तांना लेखी निवेदन देत ही योजना लागू करण्याची मागणी केली होती. तसेच दिवंगत नेते अजित पवार यांनाही पत्राद्वारे यासंदर्भात मागणी कळविण्यात आली होती.
या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले असून पिंपरी-चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने मालमत्ता करावरील व्याजमाफीची ‘अभय योजना’ सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे थकबाकीदार नागरिकांना मोठा दिलासा मिळणार असून शहरातून समाधानाची भावना व्यक्त होत आहे.
मागणीची दखल घेत महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याबद्दल आयुक्त तसेच महापालिका प्रशासनाचे अभिनंदन करत विशाल काळभोर यांनी हा निर्णय नागरिकांच्या हिताचा असल्याचे म्हटले आहे.
“काम करीत आलो – काम करीत राहणार,” अशी भावना व्यक्त करत पुढेही जनहिताचे प्रश्न सातत्याने मांडणार असल्याचे विशाल काळभोर यांनी सांगितले.
