पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प येत्या शनिवारी (दि.28) आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे सादर करणार आहेत. स्थायी समितीच्या अध्यक्षाची निवड झाल्यानंतर त्याच दिवशी होणाऱ्या पहिल्या सभेत हा अर्थंसंकल्प मांडण्यात येणार आहे. तशी तयारी महापालिका प्रशासनाकडून पूर्ण करण्यात आली आहे. नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या काळातील हा पहिला अर्थसंकल्प असणार आहे.
महापालिकेतील मागील चार वर्षांची प्रशासकीय राजवट महापौर निवडीनंतर 6 फेबुवारी 2026 पासून संपुष्टात आली. महापौर आणि उपमहापौर निवडीनंतर स्थायी समितीची स्थापना ही महत्त्वाची प्रक्रिया सुरू आहे. स्थायी समिती सदस्य नियुक्तीनंतर शनिवारी अध्यक्ष निवडीसाठी निवडणूक होत आहे. स्थायी समितीचा अध्यक्ष निवडणूक न झाल्यामुळे फेबुवारी महिन्यात अर्थसंकल्प मांडला जाणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला होता. मात्र, नियमाप्रमाणे फेबुवारी महिन्याच्या आत अर्थसंकल्प सादर करण्यासाठी स्थायी समिती अध्यक्ष निवड व त्याच दिवशी समितीची विशेष सभा घेऊन अर्थसंकल्प सादर होणार आहे.
स्थायी समितीच्या या विशेष सभेचे विषयपत्र तयार करण्यात आले आहे. महापालिकेच्या मधुकर पवळे सभागृहात शनिवारी सकाळी अकराला स्थायी समिती अध्यक्षाची निवड होणार आहे. त्यानंतर दुपारी बाराला अर्थसंकल्पाची विशेष सभा होईल. या सभेत आयुक्त श्रावण हर्डीकर स्थायी समितीपुढे हा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. नव्याने झालेल्या स्थायीच्या अध्यक्षांना पहिल्याच बैठकीत अर्थसंकल्पावर निर्णय घ्यावा लागणार आहे. तर, यंदाचा अर्थसंकल्प फुगीर नसेल. तो महापालिकेची आर्थिक स्थिती विचारात घेऊन वास्तववादी अर्थसंकल्प तयार करण्याचा प्रयत्न केल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
