Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिन्हे दिसत असून महापालिकेतील पाच विषय समित्यांच्या सभापतीपदासाठीची निवडणूक येत्या २ मार्च रोजी पार पडणार आहे. सभापतीपदासाठी इच्छुकांना आज (२५ फेब्रुवारी) दुपारी ३ ते ५ या वेळेत उमेदवारी अर्ज सादर करण्याची संधी देण्यात आली आहे. अर्ज दाखल होताच कोणत्या समितीवर कोणाची वर्णी लागणार याबाबतचे चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

अलीकडेच झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विधी, महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा–कला–साहित्य व सांस्कृतिक आणि शिक्षण समितीच्या सदस्यांची निवड जाहीर करण्यात आली. स्थायी समितीत १६ सदस्य असून उर्वरित पाच विषय समित्यांमध्ये प्रत्येकी नऊ सदस्य आहेत. या समित्यांमध्ये सत्ताधारी भाजपचे सहा तर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)चे तीन सदस्य आहेत. शिवसेनेचे सहा नगरसेवक असतानाही विषय समित्यांमध्ये त्यांना प्रतिनिधित्व मिळालेले नाही.
या पार्श्वभूमीवर पाचही विषय समित्यांवर सभापतीपद भाजपकडेच जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. विभागीय आयुक्तांच्या मान्यतेनुसार २ मार्च रोजी अर्ध्या तासांच्या अंतराने प्रत्येक समितीची निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. सर्वप्रथम विधी समिती सभापतीची निवड होईल. त्यानंतर महिला व बालकल्याण, शहर सुधारणा, क्रीडा आणि शिक्षण समिती सभापतींची निवडणूक होणार आहे. या प्रक्रियेसाठी पुणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. हे पीठासन अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, स्थायी समिती अध्यक्षपदासाठीची चुरसही लक्षवेधी ठरत आहे. या पदासाठी २५ फेब्रुवारी रोजीच अर्ज स्वीकारले जाणार असून २८ फेब्रुवारीला निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. थेरगावचे सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले अभिषेक बारणे आणि वाकडचे प्रतिनिधित्व करणारे संदीप कस्पटे यांच्यात अध्यक्षपदासाठी स्पर्धा रंगण्याची शक्यता आहे.
सभापती आणि अध्यक्षपदांच्या निवडीमुळे महापालिकेतील आगामी धोरणे, विकासकामांचे प्राधान्यक्रम आणि निधीवाटपावर मोठा प्रभाव पडणार असल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. २ मार्चनंतर महापालिकेतील सत्तासमीकरणाचे चित्र अधिक स्पष्ट होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version