चिंचवड, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – महाराष्ट्र राज्याची राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्या वतीने नेमण्यात आलेल्या तज्ञ समितीच्या वतीने ( 2024 -2025 ) मध्ये केलेल्या पाहणीत महाराष्ट्र राज्यातील 429 अ प्लस + श्रेणी प्राप्त शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाना निवडण्यात आले आहे . कनिष्ठ महाविद्यालयाच्या यादीत पिंपरी चिंचवड शहरातील एकूण कनिष्ठ महाविद्यालयापैकी चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेजची एकमेव पहिले स्वयंअर्थसय्यीत असलेल्या या कनिष्ठ महाविद्यालयाला राज्यस्तरीय ( शाळा गुणवत्ता व मूल्यांकन व आश्वासक आराखडा ) मूल्यांकन प्रक्रियेत अ प्लस + श्रेणी प्राप्त झाली आहे .
महाराष्ट्र राज्यात तब्बल 1 लाख 2 हजार 675 शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांचे अतिशय काटेकोरपणे मूल्यमापन करण्यात आले. शैक्षणिक गुणवत्ता, प्रशासनिक कार्यक्षमता, विद्यार्थी प्रगती, नवोपक्रम, पायाभूत सुविधा, शिक्षक गुणवत्ता, सामाजिक जबाबदारी अशा विविध निकषांवर छाननी करून पुढील फेरीसाठी निवड झालेल्या शाळा / कनिष्ठ महाविद्यालयापैकी, संपूर्ण महाराष्ट्रातून केवळ 429 शाळा/कनिष्ठ महाविद्यालयांना अ प्लस + श्रेणी बहाल करण्यात आली आहे.
या गौरवशाली यादीमध्ये पुणे परीसरातील चिंचवड येथील प्रतिभा ज्युनिअर कॉलेज यांचा समावेश झाला असून, या कनिष्ठ महाविद्यालयाने अ प्लस + श्रेणी प्राप्त करत शैक्षणिक गुणवत्तेचा नवा मानदंड प्रस्थापित केला आहे.
ही कामगिरी केवळ संस्थेसाठीच नव्हे तर संपूर्ण चिंचवड परिसरासाठी अभिमानास्पद व प्रेरणादायी ठरली आहे.
या यशामागे प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटच्या अध्यक्षा प्रतिभा शहा , संस्थेचे संस्थापक सचिव डॉ. दीपक शहा यांची दूरदृष्टी असलेले नेतृत्व, प्राचार्यांचे मार्गदर्शन, शिक्षकांचे समर्पित कार्य, प्रशासकीय कर्मचारीवर्गाची मेहनत, विद्यार्थ्यांची सातत्यपूर्ण शैक्षणिक प्रगती तसेच पालकांचा सक्रिय सहभाग यांचा मोलाचा वाटा आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध व्यवस्थापन, आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर आणि मूल्याधिष्ठित शिक्षणपद्धती यामुळे प्रतिभा ज्युनिअर कॉलेजने राज्यपातळीवर आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
ही घवघवीत कामगिरी म्हणजे भविष्यातील शैक्षणिक प्रगतीसाठी एक भक्कम पायाभरणी असून, येणाऱ्या काळातही प्रतिभा ज्युनिअर कॉलेज शैक्षणिक उत्कृष्टतेचा आदर्श निर्माण करेल, असा विश्वास संस्थेचे सचीव डॉ . दीपक शहा यांनी व्यक्त केला आहे.
या यशासाठी प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट चे सचिव डॉ. दीपक शहा,संचालक डॉ. तेजल शाह, खजिनदार डॉ. भूपाली शाह यांनी पुष्पगुच्छ देवून प्राचार्या डॉ. वनिता कुऱ्हाडे व त्यांच्या सर्व विभाग प्रमुख , प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी व इतर सहकाऱ्यांचे अभिनंदन करून सर्वांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
