Spread the love
डॉ. मनीषा बोरा कार्याध्यक्षपदी, तर प्रा. शरयू पवार स्वागताध्यक्षपदी
पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – विश्वबंधुता साहित्य परिषद, भारतीय जैन संघटनेचे वाघोली येथील महाविद्यालय आणि काषाय प्रकाशन पुणे या संस्थांच्या वतीने आयोजित २८ व्या विश्वबंधुता साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक आणि विचारवंत बंधुताचार्य प्रकाश रोकडे यांची निवड करण्यात आली आहे. १२ एप्रिल २०२६ रोजी नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात हे संमेलन होणार आहे. संमेलनाच्या कार्याध्यक्षपदी प्राचार्य डॉ. मनीषा बोरा, तर स्वागताध्यक्षपदी साहित्यिक प्रा. शरयू पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे, अशी माहिती परिषदेचे सरचिटणीस प्रा. शंकर आथरे यांनी दिली.
 
प्रा. शंकर आथरे म्हणाले, “प्रकाश रोकडे यांनी गेल्या पाच दशकांपासून केलेल्या बंधुता, राष्ट्रबंधुता आणि विश्वबंधुता या अखंड कार्याचा, साहित्य आणि सांस्कृतिक सेवेचा हा सन्मान आहे. त्यांच्या ‘अर्थशोध आणि बोध’, ‘मी पाण्याच्या जातीचा’, ‘आरपार बंधुता’, ‘बंधुतापर्व’, ‘प्रकाशपर्व’ ‘बंधुताचार्यांची प्रकाशगाथा’ अशा साहित्यकृती प्रकाशित झालेल्या आहेत. राष्ट्रीय बंधुता साहित्य संमेलन, रयत विचारवेध संमेलन आणि लोककवी वामनदादा कर्डक महाकाव्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषविले आहे. डॉ. मनीषा बोरा आणि प्रा. शरयू पवार यांनी शैक्षणिक क्षेत्रात मौलिक योगदान दिले असून, विविध विषयांवरील त्यांचे वैचारिक लेखनही प्रकाशित झाले आहे.”
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version