Spread the love

पिंपरी-चिंचवडमध्ये बंद अवस्थेतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा प्रश्न ऐरणीवर
नगरसेवक विनोद नढे यांचे आयुक्तांना पत्र;निविदा, खर्च व देखभालीची सविस्तर माहिती मागवली

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – पिंपरी-चिंचवड शहरातील सुरक्षेच्या दृष्टीने बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांपैकी अनेक कॅमेरे सध्या बंद अवस्थेत असल्याचा गंभीर मुद्दा समोर आला आहे. या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक  विनोद जयवंत नढे यांनी आयुक्तांकडे लेखी निवेदन देत या संपूर्ण प्रकरणाची सविस्तर माहिती मागवली आहे.
शहरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर नियंत्रण मिळवण्यासाठी महानगरपालिका आणि स्मार्ट सिटी अंतर्गत विविध ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. मात्र, प्रत्यक्षात अनेक कॅमेरे बंद असल्यामुळे पोलिस तपासात अडथळे येत असून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे, असे नढे यांनी निवेदनात नमूद केले आहे.

नढे यांनी आयुक्तांकडे पुढील मुद्द्यांवर माहिती मागवली आहे:
शहरात एकूण किती सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत आणि किती कॅमेरे बंद अवस्थेत आहेत? बंद कॅमेरे दुरुस्त करण्यासाठी प्रशासनाने कोणती पावले उचलली आहेत?
सीसीटीव्ही बसविण्याची व देखभालीची निविदा कोणत्या कंपनीला देण्यात आली? संबंधित ठेकेदारांची नावे व कराराची माहिती काय? या प्रकल्पासाठी किती निधी मंजूर झाला? त्यापैकी किती रक्कम वर्क ऑर्डरद्वारे देण्यात आली आणि आतापर्यंत किती देयके अदा करण्यात आली?
संबंधित बिलांची माहिती व करारनाम्याच्या अटी-शर्ती काय आहेत? करारानुसार देखभाल न केल्यास ठेकेदारावर कोणती दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे?

“जर सीसीटीव्ही यंत्रणा बंद राहणार असेल, तर त्यासाठी झालेला कोट्यवधी रुपयांचा खर्च व्यर्थ ठरेल. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही बाब अत्यंत गंभीर असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात,” अशी मागणी नढे यांनी केली आहे.या निवेदनामुळे शहरातील सीसीटीव्ही यंत्रणेच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून, प्रशासनाने याबाबत पारदर्शकता ठेवत संपूर्ण माहिती जाहीर करावी, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version