Spread the love

 

निगडी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – स्वातंत्र्यवीर सावरकर मंडळ, संस्कृती संवर्धन व विकास महासंघ विभाग आणि सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित१६ वा वर्धापनदिन सोहळा अत्यंत उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात संपन्न झाला. मंगळवार, दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० वाजता सिटीप्राईड ज्युनिअर कॉलेज, निगडी प्राधिकरण येथील ऑडिटोरियममध्ये हा सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.

या वर्षीच्या कार्यक्रमाचा विषय होता – “भारतीय संस्कृती व जीवन मूल्ये”. कार्यक्रमाची सुरुवात स्वागत, दीपप्रज्वलन व प्रास्ताविकाने झाली. प्रारंभीच सभागृहात भारतीय संस्कृतीचा गौरव आणि मूल्यांची जाणीव यांचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. अभयजी कुलकर्णी (संचालक – IICMR) यांची उपस्थिती लाभली. त्यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात भारतीय संस्कृतीची वैशिष्ट्ये, नैतिक मूल्यांचे महत्त्व आणि आधुनिक काळातील तरुण पिढीसमोरील आव्हाने यांचा सखोल ऊहापोह केला. त्यांनी विद्यार्थ्यांना केवळ यशस्वी नव्हे तर मूल्यनिष्ठ नागरिक बनण्याचे आवाहन केले.

प्रमुख वक्ते म्हणून जेष्ठ व्याख्याते राजेंद्र घावटे यांचे व्याख्यान झाले . या प्रसंगी राजेंद्र घावटे म्हणाले की, ” भारतीय संस्कृती ही त्यागावर आणि मानवी मूल्यांवर आधारित आहे. वैज्ञानिक कालखंडात आपल्या संस्कृती परंपरेला विसरून चालणार नाही. त्यातील मूल्यांचे जगाने श्रेष्ठत्व मान्य केले आहे. आपल्या महाकाव्यातून आणि महापुरुषांच्या चरित्रातून वैभवशाली इतिहास द्यात होतो. हे आपले संचित आहे, ज्याची जोपासना आणि अंगीकार करणे गरजेचे आहे. नव्या पिढीला संस्कारित करण्यासाठी तसेच त्यांना समाज, कुटुंब , राष्ट्र प्रति उत्तरदायित्व समजण्यासाठी
पारंपरेचे ज्ञान देण्याची जबाबदारी शिक्षकांची आहे. औपचारिक शिक्षणाबरोबरच अनौपचारिक आणि परिघाबाहेरचे शिक्षण दिले तरच सुदृढ समाज घडू शकतो. राष्ट्रीय चारित्र्य निर्माण करणारे शिक्षण देणे ही काळाची गरज आहे.”

भारतीय परंपरा, कुटुंबव्यवस्था, संस्कार आणि जीवनातील मूल्याधिष्ठित दृष्टिकोन यांचे प्रभावी विश्लेषण करत घावटे यांनी उपस्थितांना विचारप्रवृत्त केले. त्यांच्या ओघवत्या आणि प्रेरक शैलीमुळे विद्यार्थ्यांनी संपूर्ण कार्यक्रम मन लावून ऐकला.
कार्यक्रमाचे नियोजन, वेळापत्रक आणि मांडणी अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. सुमारे दीडशे विद्यार्थी , नागरिक, शिक्षक व मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. सभागृहात उत्साह, आदर, एकाग्रता आणि ज्ञानाची देवाणघेवाण यांचे प्रेरणादायी वातावरण अनुभवायला मिळाले.
कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन व पसायदानाने सोहळ्याची सांगता झाली. भारतीय संस्कृतीची जपणूक आणि जीवनमूल्यांची जोपासना करण्याचा संदेश देणारा हा १६ वा वर्धापनदिन सोहळा सर्वांच्या मनात दीर्घकाळ स्मरणात राहील, असा ठसा उमटवून गेला. स्वागत रविकांत कळंबकर व शिवानंद चौगुले यांनी केले. प्रास्ताविक डॉ. अजित जगताप यांनी केले. सूत्रसंचालन पूजा गवांदे यांनी तर आभारप्रदर्शन ह. भ. प. किसन महाराज चौधरी यांनी केले.

कार्यक्रमाचे संयोजन शिवानंद चौगुले, सुभाष चव्हाण, विकास देशपांडे, चंद्रशेखर जोशी, उज्वला केळकर यांनी तसेच सिटी प्राईड ज्युनिअर कॉलेज स्टाफ यांनी केले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version