Spread the love

 

महानगरपालिकेच्या वतीने थेरगाव येथील डांगे चौक येथे आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा’ कार्यक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) –  शिवजन्माची पावन पहाट… राजमाता जिजाऊंच्या संस्कारांची तेजस्वी छाया… तोरणा जिंकत स्वराज्याची रोवलेली पहिली मुहूर्तमेढ… लाल महालातील शौर्यगाथा… राज्याभिषेकाच्या सुवर्णक्षणाने साकारलेले हिंदवी स्वराज्य… असा शिवजन्मापासून राज्याभिषेकापर्यंतचा तेजस्वी प्रवास साकारत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय जीवनकार्याला शाहिरी पोवाड्यातून मानवंदना अर्पण करण्यात आली.

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, शौर्य, धैर्य आणि न्यायनिष्ठेचे प्रतीक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अद्वितीय कार्याला आणि व्यापक विचारधारेला अभिवादन करण्यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने महापौर रवि लांडगे, उपमहापौर शर्मिला बाबर, आयुक्त श्रावण हर्डीकर तसेच अतिरिक्त आयुक्त विक्रांत बगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वात १७ फेब्रुवारी रोजी थेरगाव येथील डांगे चौक येथील शिवसृष्टी येथे “छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडा” हा विशेष कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शाहीर सुरेश सूर्यवंशी (आसंगीकर) यांनी सादर केलेल्या या कार्यक्रमाला नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला. नगरसदस्य विश्वजित बारणे यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमाला होती. सोबतच महापालिकेचे विद्युत पर्यवेक्षक प्रमोद खराडे,करण तुपे यांच्यासह किशोर केदारी आदी उपस्थित होते.

शिवपूर्व इतिहासकाल, शिवजन्म सोहळा, स्वराज्यस्थापना ते शिवराज्याभिषेक असा सुरेल प्रवास शाहीर सुरेश सूर्यवंशी, शाहीर घनश्याम कुदळे,कांचनताई सूर्यवंशी, बालशाहीर विश्वजित सूर्यवंशी, बालशाहीर अथर्व गायकवाड, किबोर्ड वादक बापू बनसोडे, ढोलकी वादक राहुल सूर्यवंशी, झांझ वादक श्रेयस सूर्यवंशी आणि दादा गायकवाड या सर्वांनी दमदार सादरीकरणातून मांडला.

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष करत, डफ, तुणतुणे, ढोलकी, खंजिरी अशा वाद्यांच्या घोषात, पहाडी आवाजात नामवंत शाहिरांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवनचरित्र सादर केले. या कार्यक्रमातून छत्रपती शिवाजी महाराजांचा सुवर्ण इतिहास उपस्थित नागरिकांसमोर उभा राहिला. शिवजन्म सोहळा, तोरणा मोहीम अशा पोवाड्यांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

शिवजयंती निमित्त शहरात विविध ठिकाणी कार्यक्रम

पिंपरी चिंचवड महापालिकेने आयोजित केलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज विचार प्रबोधन पर्व २०२६’ अंतर्गत १९ फेब्रुवारी २०२६ रोजी शहरात विविध ठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये निगडी प्राधिकरण येथील नियोजित महापौर निवास मैदान येथे सायंकाळी ७ वाजता मा. राष्ट्रपती महोदय यांच्या समोर सादर झालेले ‘शिवगर्जना’ हे घोडे, उंट यांसह ३०० कलाकारांचा समावेश असलेले भव्य महानाट्य सादर होणार आहे. याशिवाय चिंचवड येथील डांगे चौक येथे सायंकाळी ७ वाजता शिवशाहीर डॉ. विजय महाराज तनपुरे यांचे ‘यशाचा नवा मंत्र-शिवतंत्र’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तर पिंपरी येथील एच. ए. कॉलनी येथे सकाळी ९ वाजता व्याख्याते बालाजी काशिद (सदस्य, भारत इतिहास संशोधन मंडळ) व दस्तगीर काझी यांचे ‘छत्रपती शिवाजी महाराज : एक आदर्श राजे’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. तसेच चिंचवड येथील संभाजीनगर येथे सायंकाळी ७ वाजता सुप्रसिद्ध व्याख्याते अविनाश भारती यांचे ‘आदर्श राजे – छत्रपती शिवाजी महाराज’ या विषयावर व्याख्यान होणार आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version