Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज ) – नढे नगर, काळेवाडी परिसरात आज दुपारी एक धक्कादायक घटना घडली. परिसरातून जात असताना एका मुस्लिम बांधवाच्या स्कुटीने अचानक पेट घेतल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने, उपस्थित असलेल्या चिरंजीव प्रणेश सुभाष भोसले यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ आगीवर नियंत्रण मिळवले आणि संभाव्य मोठा अनर्थ टाळला.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, स्कुटी अचानक धूर सोडू लागली आणि क्षणार्धात तिला आग लागली. घटनेच्या वेळी परिसरात नागरिकांची वर्दळ होती. आग वाढत गेल्यास गाडीचा स्फोट होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. अशा गंभीर परिस्थितीत प्रणेश भोसले यांनी धाडस दाखवत तत्परतेने प्रयत्न केले. स्थानिकांच्या मदतीने त्यांनी आगीवर नियंत्रण मिळवले आणि परिस्थिती सुरळीत केली.
या धाडसी व तत्पर कृतीमुळे मोठी जीवितहानी टळली. घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी प्रणेश यांच्या धाडसाचे कौतुक केले.

दरम्यान, या उल्लेखनीय कार्याबद्दल काळेवाडी पोलीस स्टेशन चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र बहिरट यांनी प्रणेश सुभाष भोसले यांचा प्रशंसापत्र देऊन सन्मान केला. पोलिसांनी त्यांच्या प्रसंगावधानाचे व सामाजिक बांधिलकीचे कौतुक करत अशा तरुणांकडून समाजाला प्रेरणा मिळते, असे मत व्यक्त केले.
या घटनेमुळे नागरिकांनी वाहनांच्या सुरक्षिततेबाबत दक्षता घेण्याची गरजही अधोरेखित झाली आहे. वेळेवर दाखवलेल्या धाडसामुळे एक मोठा अनर्थ टळला असून प्रणेश भोसले यांच्या कृतीचे सर्वत्र स्वागत होत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version