Spread the love

देहूगाव, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) –  संत तुकाराम महाराज यांच्या मूर्तीची जर्मनीतील विठ्ठल धाम येथे उभारण्यात आलेल्या भगवान विठ्ठल मंदिरात प्रतिष्ठापना होणार असून, त्या मूर्तीचे देहू देवस्थान संस्थानच्या वतीने विधिवत पूजन करण्यात आले. देहूतून जर्मनीपर्यंत विठ्ठलनामाचा गजर पोहोचणार असून, संत परंपरेचा संदेश आता सातासमुद्रापारही जाणार आहे.

देहूत भक्तिमय वातावरण

शुक्रवारी दुपारी तीन वाजता टाळ-मृदंगाच्या गजरात, ज्ञानेश्वर माऊली तुकाराम आणि विठ्ठल नामाच्या जयघोषात हा सोहळा पार पडला. या वेळी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला होता. उपस्थित वारकरी, भाविक आणि विश्वस्तांच्या डोळ्यांत भक्तीचे अश्रू, तर ओठांवर विठ्ठलनामाचा जयघोष होता. हा सोहळा केवळ संस्थानपुरता मर्यादित नसून, प्रत्येक मराठी मनाचा आणि वारकरी संप्रदायाच्या श्रद्धेचा अभिमानाचा क्षण ठरला. आपल्या लाडक्या तुकोबांची मूर्ती जर्मनीच्या भूमीवर जाणार असल्याने भाविकांमध्ये उत्साह आणि समाधानाची भावना होती.

पूजा, आरती संपन्न

माघ वद्य एकादशी या अत्यंत मंगल दिवशी हा ऐतिहासिक सोहळा संपन्न झाला. श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष, विश्वस्त तसेच समस्त वारकरी, भाविकांच्या साक्षीने मूर्तीचे विधिवत मंगेश पाटील यांच्या हस्ते, देहू नगरपंचायतीचे मुख्याधिकारी चेतन कोंडे, नगराध्यक्षा पूजा दिवटे, देहू देवस्थान संस्थानचे अध्यक्ष जालिंदरमहाराज मोरे, विश्वस्त दिलीपमहाराज मोरे, वैभवमहाराज मोरे, विक्रमसिंहमहाराज मोरे, उमेशमहाराज मोरे, गणेशमहाराज मोरे, संजय बालवडकर, पी. आर. पाटील, माजी विश्वस्त नितीनमहाराज मोरे व आरती करण्यात आली.

संत परंपरेचा संदेश सातासमुद्रापार जाणार

संत तुकाराम महाराजांची मूर्ती संजय आंबेकर हे जर्मनीला घेऊन जाणार आहेत. चिखली येथील मूर्तिकार सतीश हिंगे यांनी ही दोन फूट उंचीची आकर्षक मूर्ती काळ्या पाषाणापासून घडवली आहे. जर्मनी येथील ख्रिर्षहाईम येथील विठ्ठलधाम मंदिरात अक्षय तृतीयाला (19 एप्रिल 2026) जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार आहे. यासाठी श्रीक्षेत्र देहूगाव येथून विश्वस्त लक्ष्मणमहाराज मोरे, माजी विश्वस्त नितीनमहाराज मोरे, सुनीलमहाराज मोरे, सूर्यकांत मोरे, सुरेश काळोखे, सुरेखा काळोखे, सुनील झेंडे, मीना झेंडे, श्रीकांत पाटील, संजय बालवडकर, रथाचे मानकरी सतीश सोलंकी आदींसह चाळीस भाविक जर्मनीला जाणार आहेत.

देहूतून जर्मनीपर्यंत विठ्ठलनामाचा गजर पोहोचणार असून, संत परंपरेचा संदेश आता सातासमुद्रापारही जाणार आहे. वारकरी संप्रदायासाठी हा क्षण अभिमानाचा आणि इतिहासात नोंदवला जाणारा ठरला आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version