पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुणे मेट्रो प्रशासनाने प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि वेळेची बचत करणारा व्हावा, या उद्देशाने शहरातील तीन महत्त्वाच्या स्थानकांवर अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. दि. १४ रोजी पासून पिंपरी-चिंचवड मनपा, शिवाजीनगर आणि स्वारगेट मेट्रो स्थानकांवरील नवीन प्रवेशद्वारे प्रवाशांच्या सेवेसाठी खुली करण्यात येणार आहेत.
महामेट्रोकडून या तिन्ही स्थानकांवर भुयारी मार्गाच्या माध्यमातून प्रवेशद्वारांची कामे पूर्ण करण्यात आली असून, त्यास मेट्रो रेल सुरक्षा आयुक्तांची मंजुरी मिळाली आहे. या सुविधेमुळे प्रवाशांना वर्दळीचे मुख्य रस्ते ओलांडण्याची गरज कमी होणार असून, सुरक्षिततेत वाढ होईल. तसेच वेळ आणि श्रमाची बचत होणार आहे. स्वारगेट मेट्रो स्थानक येथे प्रवेशद्वार क्रमांक ५ एसटी स्थानकाच्या बाजूला भुयारी मार्गाने सुरू करण्यात येत आहे. अनेक दिवसांपासून प्रलंबित असलेली ही मागणी अखेर पूर्ण झाली आहे. यामुळे एसटी बसने येणाऱ्या प्रवाशांना थेट मेट्रोमध्ये प्रवेश मिळणार आहे. स्वारगेट चौकातील वाहतूक कोंडी आणि भरधाव वाहनांमधून रस्ता ओलांडण्याचा धोका टळणार असून, जेधे चौक परिसरातील ताण कमी होण्यास मदत होईल.
शिवाजीनगर येथे शिमला ऑफिस चौकातून प्रवेश
शिवाजीनगर मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ आकाशवाणी केंद्राजवळील शिमला ऑफिस चौकात भुयारी मार्गाने सुरू होत आहे. गणेशखिंड रस्ता आणि कृषी महाविद्यालयाच्या बाजूने येणाऱ्या प्रवाशांना थेट स्थानकात पोहोचणे अधिक सोयीचे होणार आहे. या नव्या प्रवेशद्वारामुळे मुख्य रस्ता आणि मेट्रो स्थानक यांच्यात सुरक्षित व सुलभ जोडणी निर्माण झाली आहे.
पिंपरी-चिंचवड मनपा स्थानकावर महामार्गालगत प्रवेश
पिंपरी-चिंचवड मनपा मेट्रो स्थानक येथील प्रवेशद्वार क्रमांक ३ पुणे-मुंबई महामार्गावर, पुण्याकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर उघडण्यात येत आहे. त्यामुळे शहरातून स्थानकात येणाऱ्या तसेच बाहेर जाणाऱ्या प्रवाशांना रस्ता ओलांडण्याची आवश्यकता राहणार नाही. पिंपरी-चिंचवड महापालिका परिसरात ये-जा करणाऱ्या नागरिकांनाही या सुविधेचा मोठा फायदा होणार आहे.
मेट्रोची वाढती प्रवासी संख्या आणि त्यांच्या सोयी लक्षात घेऊन ही अतिरिक्त प्रवेशद्वारे सुरू करण्यात येत आहेत. मुख्य रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यास तसेच सुरक्षित प्रवासाला चालना देण्यास या उपक्रमाची मदत होईल. -श्रावण हर्डीकर, व्यवस्थापकीय संचालक, महामेट्रो
