पुणे, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – राज्य सफाई कर्मचारी आयोगाचे उपाध्यक्ष मुकेश सारवान यांनी पुण्यात सफाई कामगार आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांसोबत बैठक घेऊन सफाई कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांवर तातडीने तोडगा काढण्याचे आश्वासन दिले. कर्मचाऱ्यांच्या तक्रारी गांभीर्याने घेत प्रशासनाला स्पष्ट इशारा देत, समस्या वेळेत न सुटल्यास संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल, असे त्यांनी ठामपणे सांगितले.
सार्वजनिक बांधकाम विभाग, पुणे येथील १५ कायमस्वरूपी सफाई कर्मचाऱ्यांना ऑक्टोबरपासून वेतन न मिळाल्याची बाब बैठकीत मांडण्यात आली. याप्रकरणी मुख्यमंत्री सचिवालय, महाराष्ट्र राज्य सफाई कर्मचारी आयोग, राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोग व राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव, अतिरिक्त सचिव, जिल्हाधिकारी पुणे, अधीक्षक अभियंता तसेच सामाजिक न्याय विभागाचे प्रमुख सचिव यांना नोटीस बजावली आहे. तीस दिवसांच्या आत योग्य ती कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
बैठकीस ॲड. सागर चरण, अनिल चावरे, शैलेंद्र म्हेत्रे, मोनिश शशिकांत म्हेत्रे, जीवन दयाल, दिनेश देशमुख, सचिन चावरिया, शम्मी कसोटे यांच्यासह विविध सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
