हिंदमाता व्याख्यानमाला पुष्प तिसरे
तळेगाव दाभाडे,(महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – आज आयआयएम, आयआयटी, एनआयएफटी अशा प्रसिद्ध शैक्षणिक संस्थांमध्ये या क्षेत्रात विविध करिअर संधी उपलब्ध झाल्या आहेत. नवीन नियुक्त्या वाढत आहेत. या संस्थांमध्ये मराठी टक्का वाढायला हवा. त्यामुळे पालकांनी मुलांची अंगभूत क्षमता, बौद्धिक क्षमता, आर्थिक क्षमता ओळखून मुलांना प्रोत्साहित करावे, असे प्रतिपादन माहिती व जनसंपर्क विभागाचे माजी संचालक सुरेश वांदिले यांनी केले. दरम्यान, भंडारा डोंगरावर जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर कामासाठी हिंदविजय पतसंस्थेच्या वतीने एक लाख रुपयांचा धनादेश ट्रस्टकडे सुपूर्द केला.
तळेगाव दाभाडे येथील हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने वर्धापन दिनानिमित्त ‘हिंदमाता व्याख्यानमाले’तील तिसरे पुष्प सुरेश वांदिले यांनी गुंफले. त्यांनी ‘भविष्यवेधी करिअर व एआय’ या विषयावर विचार व्यक्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेचे अध्यक्ष ज्येष्ठ उद्योजक रामदास काकडे होते. यावेळी सीआरपीएफचे कमांडंट पंकज गुप्ता, हिंदविजय नागरी सहकारी पतसंस्थेचे संस्थापक ऍड. रवींद्रनाथ दाभाडे, अध्यक्ष विभावरी दाभाडे, गिरीश खेर, सुकनशेठ बाफना, नामदेवराव आंद्रे, दीपक राऊत, संजय वाडेकर, डॉ. रवी आचार्य, राहुल पारघे, अरुण काशीद, महेश शहा, डॉ. शाळीग्राम भंडारी, हिम्मत पुरोहित, प्रा. कृष्णराव मोहिते, संदीप भुतडा आदी उपस्थित होते.
सुरेश वांदिले पुढे बोलताना म्हणाले, की मुलांना जे आवडते, मनात भावलेल्या क्षेत्रात करिअर करणे क्रमप्राप्त आहे. मुलांची अंगभूत आवड लक्षात घेऊन पालकांनी अभ्यासक्रम निवडावेत. आवड जोपासली तर कोणत्याही क्षेत्रात करिअर करता येईल. CUET UG या एका परीक्षेद्वारे विविध अभ्यासक्रम घेऊन करिअर करता येईल. IIM मध्ये इंटिग्रेटेड एमबीए अभ्यासक्रम सुरू झाला आहे. यासाठी पालकांनी निश्चित विचार करावा. यंदापासून काही अभ्यासक्रम ४ वर्षाचेही सुरू केलेत. NIFT मध्ये अनेक फॅशन डिझायनरची यशस्वी उदाहरणे देत बॅचलर इन फॅशन डिझाईन अभ्यासक्रम चांगला आहे. बॅचलर इन फॅशन टेक्नॉलॉजी या अभ्यासक्रमातही अनेक संधी आहेत. मराठी मुले या संस्थांत जायला हवीत.
आयआयटी या संस्थेत कोणत्याही शाखेतल्या मुलांना प्रवेश मिळू शकतो, हे अनेकांना माहीतच नाही. या संस्थेने बॅचलर इन डिझाईन अभ्यासक्रम सुरू केला आहे. JEE प्रवेश परीक्षेशिवाय या अभ्यासक्रमाला प्रवेश मिळवता येईल.
वांदिले यांनी सांगितले, की इंडियन मेरिटाईम युनिव्हारसिटीमध्ये संधी मोठ्या आहेत. भारत सरकारने इंडियन इन्स्टिटयूट ऑफ ट्रॅव्हल अँड टुरिझम अभ्यासक्रम सुरू केला आहे. यासोबतच हॉटेल ऍडमिनिस्ट्रेशन अभ्यासक्रमामध्ये मोठ्या संधी आहेत. दुर्दैवाने या संस्थांत मराठी टक्का फार कमी आहे. फुटवेअर डिझाईन अँड प्रोडक्शन हा केंद्र सरकारचा अभ्यासक्रम आहे. याकडेही मराठी मुले दुर्लक्ष करत आहेत.
विमानतळावरील व्यवस्थापन कौशल्यावर आधारित केंद्र सरकारने दीड वर्षाचा अभ्यासक्रम सुरू केलेला आहे. यामध्ये विविध पदे आहेत. संशोधनावर अनेक देशात खर्च केला जातो. भारतात मात्र यावर अल्प खर्च केला जातो. त्यामुळे भारत सरकारने आता जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. पुण्यात आयसर ही संशोधन संस्था आहे. पहिल्या वर्षांपासून विद्यार्थ्यांना संशोधन करण्याची संधी मिळते. अणूऊर्जा विभागानेही अशा दोन संस्था सुरू केल्या आहेत. इथे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते.
IIT व IIM या संस्थांमध्ये करिअर आधारित अभ्यासक्रम आहेत. मात्र, मराठी मुलांमध्ये रुची नाही किंवा या अभ्यासक्रमाबद्दल माहितीच नाही. AI मुळे रोजगारवार परिणाम होईल असे वाटत नाही. सरकारने या क्षेत्रासाठी मोठी गुंतवणूक केल्याने या क्षेत्रातही अनेक संधी निर्माण झाल्या आहेत, असेही सुरेश वांदिले यांनी सांगितले.
अध्यक्षीय भाषणात रामदास काकडे म्हणाले, की चांगले विषय घेऊन चालणारी व्याख्यानमाला ही चळवळ झाली पाहिजे. तरुणांनी विविध क्षेत्रात करिअर बाबत विचार करण्याची क्षमता ठेवली पाहिजे. आपली टेक्नॉलॉजी विसरून चालणार नाही. आज १५ टक्के लाभांश देणाऱ्या पतसंस्था फार कमी आहेत. हिंद विजय नागरी सहकारी पतसंस्था राबवित असलेले उपक्रम स्तुत्य आहेत.
सीआरपीएफचे कमांडंट पंकज गुप्ता यांनी सीआरपीएफ’बाबत माहिती दिली. पाहुण्यांचा परिचय शामराव इंदोरे यांनी, सूत्रसंचालन सचिव कैलास भेगडे, प्रदीप टेकवडे, सुहास धस यांनी, तर आभार राजेश सरोदे यांनी मानले.
देवराई संस्थेला हिंदविजय पर्यावरण रक्षक पुरस्कार प्रदान :
बारा हजाराहून जास्त देशी वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षण, आदिवासी भागात ६८ तलाव केले आहेत, तसेच विविध तलावातील गाळ काढून पाणी क्षमता वाढविलेल्या मावळमधील देवराई संस्थेला हिंदविजय पर्यावरण रक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आला. सुकनशेठ बाफना, गिरीश खेर व पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्वीकारला. दरम्यान, कारगील योद्धा सुबोध तिवारी व नानासाहेब भोसले यांचा, तसेच सीआरपीएफ जवान चंद्रशेखर महाले व जावेद खान यांचाही सन्मान करण्यात आला.
