Spread the love
तळेगाव, (महाराष्ट्र  ब्रेकिंग न्यूज) – वाढते प्रदूषण आणि हवामान बदलाच्या संकटावर मात करण्यासाठी वृक्षारोपण हाच सर्वोत्तम पर्याय आहे, हा संदेश देत एस.एम.एस.ई.टी. बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी सामाजिक बांधिलकी जपली आहे. वन विभागाने विकसित केलेल्या तळेगाव वन उद्यान, सोमाटणे फाटा येथे महाविद्यालयाच्या वतीने नुकतेच मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये आवळा, करंज, जांभूळ, शिसम आणि वावळा यांसारख्या विविध देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करण्यात आली.
वनविभागाच्या वडगाव परिक्षेत्र कार्यालयाने सोमाटणे फाटा येथे सुमारे साडेचार हेक्टर जागेत देशी वृक्ष लागवडीचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आहे. हवेतील ऑक्सिजनचे प्रमाण वाढवणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे या मुख्य उद्देशाने हा परिसर हिरवाईने नटवला जात आहे. या ठिकाणी आतापर्यंत हजारो देशी वृक्षांची लागवड करण्यात आली असून, बी.एड. कॉलेजच्या विद्यार्थ्यांनीही या मोहिमेत आपला सक्रिय सहभाग नोंदवला.
या उपक्रमासाठी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पल्लवी वर्तक आणि प्रा. शितल महाले यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. तसेच, वनविभागाच्या वतीने वडगाव वन परिक्षेत्राचे अधिकारी प्रकाश शिंदे, वन परिमंडळ अधिकारी हिरेमठ एम. एस. आणि वनरक्षक योगेश कोकाटे यांनी उपस्थित राहून विद्यार्थ्यांना वृक्षारोपणाचे महत्त्व सांगत तांत्रिक सहकार्य केले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये पर्यावरणाविषयी जनजागृती निर्माण झाली आहे.
प्रा. शितल महाले म्हणाल्या, “केवळ झाडे लावणे पुरेसे नसून, त्यांचे संगोपन करणे ही काळाची गरज आहे. भावी शिक्षक म्हणून आमच्या विद्यार्थ्यांनी निसर्गाप्रती असलेली आपली जबाबदारी ओळखून या उपक्रमात सहभाग घेतला आहे. देशी वृक्षांमुळे स्थानिक जैवविविधता टिकून राहण्यास मोठी मदत होईल.”
Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version