स्वच्छता, वृक्षारोपण आणि जलसंवर्धनातून विद्यार्थ्यांनी दिला समाजसेवेचा संदेश
आकुर्डी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि डॉ. डी. वाय. पाटील औषधनिर्माणशास्त्र महाविद्यालय (फार्मसी), आकुर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने मावळ तालुक्यातील साईबाबा सेवाधाम, कान्हे येथे विशेष हिवाळी शिबीर उत्साहात पार पडले. दि. २७ जानेवारी ते २ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत आयोजित या शिबिरामध्ये ५० स्वयंसेवकांनी ‘समाजसेवेचा जागर’ करत विविध उपक्रम राबविले.
विविध सामाजिक उपक्रमांवर भर
शिबिरादरम्यान स्वयंसेवकांनी सेवाधाम परिसराची स्वच्छता केली. विशेषतः किनारा वृद्धाश्रमाजवळ औषधी गुणधर्म असलेल्या शेवग्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यात या वनस्पतीचा लाभ वृद्धाश्रमातील रहिवाशांना होणार आहे. यासोबतच पाणी टंचाईवर मात करण्यासाठी ‘शोषखड्डे’ तयार करून जलसंवर्धनाचा महत्त्वाचा संदेश देण्यात आला.
व्याख्याने आणि ऐतिहासिक वारसा संवर्धन
विद्यार्थ्यांच्या मानसिक स्वास्थ्यासाठी गीता होनराव यांनी “ध्यान आणि मानसिक आरोग्य” या विषयावर मार्गदर्शन केले. तसेच, ऐतिहासिक बेडसे लेणी परिसरात स्वच्छता मोहीम राबवून प्लास्टिक कचरा संकलित करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये ऐतिहासिक वारसा जपण्याबाबत जागरूकता निर्माण झाली.
मान्यवरांचे मार्गदर्शन
समारोप प्रसंगी किनारा वृद्धाश्रमाच्या संस्थापक प्रीती वैद्य म्हणाल्या की, “अशा उपक्रमांमुळे विद्यार्थी भविष्यात जबाबदार व सुजाण नागरिक बनतील.” महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. निरज व्यवहारे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सांगितले की, “शिबिरातील हे अनुभव केवळ समाजसेवा नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची शिदोरी आहे.
विद्यार्थ्यांनी वृद्धांसोबत घालवलेला वेळ आणि त्यांचे श्रमदान कौतुकास्पद आहे.”
श्री. कुलकर्णी, व्यवस्थापक (किनारा वृद्धाश्रम).हे शिबीर यशस्वी करण्यासाठी रा. से. यो. कार्यक्रमाधिकारी डॉ. आशिष चिंबाळकर, डॉ. पवनकुमार वानखडे, प्रा. कल्याणी सहारे, डॉ. अनिकेत गरुड आणि विद्यार्थी समन्वयक अभिजीत मरुरे व सोमनाथ गवळी यांनी विशेष परिश्रम घेतले.
