Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांना नियमित व शुद्ध पाणीपुरवठा देणे हे आपले प्रमुख उद्दिष्ट असल्याचे नवनिर्वाचित महापौर रवि लांडगे यांनी स्पष्ट केले आहे. भाजपने नागरिकांना दिलेला दररोज पाणीपुरवठ्याचा शब्द माझ्याच कार्यकाळात पूर्ण केला जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पत्रकारांशी संवाद साधताना महापौर लांडगे म्हणाले की, प्रशासकीय राजवटीत नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले आहे, याची आम्हाला पूर्ण जाणीव आहे. आता लोकप्रतिनिधी म्हणून सर्व नगरसेवक नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहतील. पाणी, स्वच्छता आणि आरोग्य या मूलभूत गरजांना प्राधान्य दिले जाईल.
शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था सुधारण्यासाठी चिखली जलशुद्धीकरण केंद्र, रावेत बंधारा तसेच भामा आसखेड जलवाहिनीच्या कामांची पाहणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. भामा आसखेड प्रकल्पातील ठेकेदाराकडून झालेल्या दिरंगाईमुळे दररोज पाणीपुरवठ्यात अडथळे येत असून, संबंधित ठेकेदारावर कारवाई करून काम काढून घेण्याचा निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
महापालिकेची आर्थिक परिस्थिती समजून घेण्यासाठी आयुक्तांशी चर्चा केली जाणार असून, महापालिकेला पूर्णवेळ आयुक्त मिळावा यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली जाईल, असे महापौर लांडगे यांनी सांगितले. राज्य सरकारकडून महापालिकेला पूर्ण सहकार्य मिळेल, त्यामुळे आर्थिक अडचणी येणार नाहीत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

प्रशासकीय काळात झालेल्या कामांची सविस्तर माहिती घेतल्यानंतर आवश्यक तेथे चौकशीचा निर्णय घेतला जाईल. तसेच, निवडणूक प्रचारात उपस्थित करण्यात आलेल्या सर्व मुद्द्यांचा आढावा घेतला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
महापालिका शाळांचा शैक्षणिक दर्जा उंचावणे, मोकाट श्वानांचा बंदोबस्त करणे, नगरसेवकांच्या तक्रारींची तत्काळ दखल घेणे आणि महापालिकेचा आकृतीबंध मंजूर करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आश्वासनही महापौरांनी दिले. विकास आराखड्यावर आलेल्या सुमारे ५० हजार हरकतींची तपासणी करून आवश्यक सुधारणा केल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, शहरात गेल्या सहा वर्षांपासून एक दिवसाआड पाणीपुरवठा सुरू असून, धरणात पुरेसा साठा असतानाही नागरिकांना नियमित पाणी मिळत नाही. अशा परिस्थितीत महापौर रवि लांडगे यांनी दिलेल्या दररोज पाणीपुरवठ्याच्या आश्वासनामुळे नागरिकांमध्ये आशा निर्माण झाली असून, प्रत्यक्षात ही योजना कधी सुरू होणार याकडे शहराचे लक्ष लागले आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version