Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांनी कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून सर्वसामान्य जनतेचे प्रबोधन केले. देव हा दगडाच्या मूर्तीत नसून गोरगरीब, रंजल्या-गांजल्यांना मदत करण्यात आहे, हा मानवतावादी संदेश त्यांनी दिला. “जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा” या अभंगातून त्यांनी सामाजिक समतेचा आणि माणुसकीचा विचार मांडला, असे प्रतिपादन मराठा सेवा संघाच्या शिक्षक परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी केले.

जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ४१८ व्या जयंतीनिमित्त मराठा सेवा संघ, जिजाऊ ब्रिगेड व संभाजी ब्रिगेड यांच्या वतीने वल्लभनगर येथील संत तुकाराम महाराज पुतळा मंदिर परिसरात जयंती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मराठा सेवा संघाचे शहराध्यक्ष आबासाहेब ढवळे यांच्या हस्ते संत तुकाराम महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
कार्यक्रमास मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे, वसंत पाटील, दिलीप गावडे, प्रकाश बाबर, अशोक सातपुते, सुरेश इंगळे, जिजाऊ ब्रिगेडच्या शहराध्यक्षा सुलभा यादव, कौशल्या जाधव, वंदना क्षीरसागर, करुणा यादव आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी पुढे बोलताना प्रकाश जाधव म्हणाले की, अज्ञान, अंधश्रद्धा, अनिष्ट रूढी-परंपरा आणि सामाजिक विषमता याविरोधात संत तुकाराम महाराजांनी निर्भीडपणे आवाज उठवला. कीर्तन आणि अभंगांच्या माध्यमातून समाजाला जागृत करून परिवर्तनाची दिशा देण्याचे महान कार्य त्यांनी केले.

या कार्यक्रमाचे आयोजन मराठा सेवा संघाचे मार्गदर्शक व जगद्गुरू प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अ‍ॅड. लक्ष्मण रानवडे यांनी केले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश इंगळे यांनी केले, तर आभार प्रदर्शन वसंत पाटील यांनी मानले.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version