पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत भाजपने पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत मिळवत सत्ता अबाधित राखली आहे. विशेष बाब म्हणजे भाजपचे शहराध्यक्ष म्हणून बापू काटे यांची निवड झाल्यानंतर अवघ्या आठ महिन्यांच्या कालावधीतच हा मोठा राजकीय यशाचा टप्पा गाठण्यात आला आहे. त्यामुळे शहराध्यक्ष बापू काटे यांच्या नेतृत्वावर पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मतदारांनी दाखवलेला विश्वास पुन्हा अधोरेखित झाला आहे.
२०१७ च्या महापालिका निवडणुकीत भाजपने प्रथमच पिंपरी-चिंचवडमध्ये सत्ता मिळवली होती. त्यानंतर २०२२ च्या कालावधीत विविध विकासकामे, केंद्र व राज्य सरकारच्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी आणि संघटनात्मक बांधणी यामुळे भाजपचा जनाधार अधिक मजबूत झाला. याच पार्श्वभूमीवर २०२५ मध्ये बापू काटे यांची भाजप शहराध्यक्षपदी निवड झाली. त्यांच्या नियुक्तीनंतर पक्ष संघटना अधिक सक्रिय झाली असून, बूथ पातळीपर्यंत कार्यकर्त्यांचे जाळे मजबूत करण्यात आले.
शहराध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर बापू काटे यांनी कार्यकारिणीची पुनर्रचना करत संघटनात्मक शिस्त, सातत्यपूर्ण संपर्क आणि जनतेच्या प्रश्नांवर थेट संवाद यावर भर दिला. शहरातील विविध भागांत बैठका, कार्यक्रम आणि विकासकामांचा आढावा घेत कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण करण्यात आले. त्याचा थेट परिणाम महापालिका निवडणुकीत दिसून आला.
या निवडणुकीत भाजपला मिळालेले बहुमत हे केवळ निवडणूक यश नसून, गेल्या काही वर्षांत केलेल्या विकासकामांवर आणि नेतृत्वावर मतदारांनी टाकलेली मोहोर असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. शहरातील पायाभूत सुविधा, रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य क्षेत्रातील कामांमुळे भाजपला मोठा जनसमर्थन लाभला.
निकालानंतर बोलताना शहराध्यक्ष बापू काटे यांनी हा विजय कार्यकर्त्यांच्या मेहनतीचा आणि नागरिकांच्या विश्वासाचा असल्याचे सांगितले. आगामी काळात शहराचा सर्वांगीण विकास, पारदर्शक कारभार आणि नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी भाजप अधिक जोमाने काम करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
अवघ्या आठ महिन्यांत शहराध्यक्ष म्हणून प्रभावी नेतृत्व सिद्ध करत बापू काटे यांनी भाजपला पुन्हा सत्तेत आणण्यात मोलाची भूमिका बजावली असून, पिंपरी-चिंचवडच्या राजकारणात त्यांच्या नेतृत्वाची ठसठशीत छाप उमटली आहे.
