निसर्गासाठी झटणारा माणूस, विकासासाठी लढणारा उमेदवार – शंतनू विलास नांदगुडे
पिंपळे निलख, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज)– प्रभाग क्रमांक 26 मधील पिंपळे निलख, वाकड आणि कस्पटे वस्ती परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी शंतनू विलास नांदगुडे निवडणूक लढवत आहेत. स्थानिक नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांना प्राधान्य देत विकासाभिमुख आणि पारदर्शक कारभार करण्याचा त्यांचा संकल्प आहे.
शंतनू विलास नांदगुडे हे केवळ सामाजिक कार्यकर्ते नाहीत, तर ते एक निसर्गप्रेमी म्हणूनही परिसरात ओळखले जातात. प्रभाग क्रमांक 26 मध्ये त्यांनी अनेक ठिकाणी वृक्षारोपण करून त्या वृक्षांचे संगोपन करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने पुढाकार घेतला आहे. रोपे लावणे एवढ्यावरच न थांबता त्यांचे संवर्धन, पाणीपुरवठा आणि संरक्षण यासाठीही त्यांनी स्वतः लक्ष घातले आहे. निवडणुकीच्या धावपळीत आणि राजकीय वातावरणाच्या गडबडीतही त्यांचे निसर्गावरील प्रेम तसूभरही कमी झालेले नाही, हे त्यांच्या कार्यातून स्पष्टपणे दिसून येते.
निसर्गाच्या सानिध्यात रमणे, परिसरात हरित पट्टा वाढवणे आणि पर्यावरणपूरक विकास साधणे हा त्यांचा मूलभूत दृष्टिकोन आहे. याच विचारातून ते विकासाच्या संकल्पनेत पर्यावरणाचा समतोल राखण्यावर भर देत आहेत. रस्ते, पाणी, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधांसोबतच उद्याने, झाडे आणि मोकळ्या जागांचे संरक्षण हेही त्यांच्या विकास आराखड्यात समाविष्ट आहे.
“विकास म्हणजे फक्त काँक्रीट नव्हे, तर माणूस आणि निसर्ग यांचा समतोल साधणे,” असे मत व्यक्त करत शंतनू नांदगुडे यांनी अपक्ष पॅनेलच्या माध्यमातून प्रभाग 26 साठी सकारात्मक, दीर्घकालीन आणि पर्यावरणपूरक विकास घडवण्याचा विश्वास नागरिकांना दिला आहे.
