Spread the love

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पुनावळे, वाकड आणि ताथवडे परिसरात प्रभाग क्रमांक २५ मधील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे उमेदवार चेतन पवार यांनी हातात मशाल घेऊन काढलेली प्रचारफेरी संपूर्ण परिसराचे राजकीय वातावरण ढवळून काढणारी ठरली.

‘मशाल’ या निवडणूक चिन्हासह चेतन पवार थेट जनतेत उतरल्याने, ही फेरी केवळ प्रचारापुरती न राहता परिवर्तनाचा निर्धार व्यक्त करणारी ठरली.
घराघरांतून, गल्ल्यागल्ल्यांतून नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असताना “प्रभागात बदल हवा”, “काम करणारा नगरसेवक हवा” अशा घोषणा परिसरात दुमदुमत होत्या. चेतन पवार यांनी स्थानिक प्रश्नांवर थेट बोट ठेवत सत्ताधाऱ्यांच्या अपयशावर जोरदार हल्लाबोल केला. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, कचरा व्यवस्थापन, वाहतूक कोंडी आणि अनियोजित विकासामुळे नागरिक त्रस्त असल्याचा संताप या प्रचारफेरीत स्पष्टपणे दिसून आला.
“मशाल ही केवळ चिन्ह नाही, ती अन्याय, दुर्लक्ष आणि भ्रष्ट कारभाराविरोधातील लढ्याची ज्योत आहे,” असे ठाम शब्दांत चेतन पवार यांनी सांगितले. गेल्या अनेक वर्षांत प्रभाग २५ ला केवळ आश्वासनांची खैरात मिळाली, प्रत्यक्ष विकास मात्र कागदावरच राहिला, असा आरोप करत त्यांनी येत्या काळात पारदर्शक व लोकाभिमुख कारभार देण्याचा निर्धार व्यक्त केला.

तरुण, महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने या प्रचारफेरीत सहभागी झाले होते. उबाठा गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड जोश दिसून आला असून, प्रभाग २५ मध्ये सत्ताधाऱ्यांविरोधात वातावरण तापू लागल्याचे स्पष्ट संकेत या फेरीतून मिळाले. मशालीच्या प्रकाशात चेतन पवार यांची ही आक्रमक प्रचारफेरी आगामी निवडणुकीत मोठा राजकीय उलथापालथ घडवेल, अशी चर्चा आता मतदारांमध्ये रंगू लागली आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version