पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ९ मधील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अधिकृत उमेदवार राहुल भोसले पुन्हा एकदा विजयाची हॅट्रिक साधणार का, याची जोरदार चर्चा सध्या प्रभागात रंगली आहे.
मागील दोन टर्ममध्ये विकासकामांचा ठसा उमटवणारे, नागरिकांशी थेट संवाद ठेवणारे आणि सतत मैदानात सक्रिय राहिलेले राहुल भोसले यांना यंदाही नागरिकांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र आहे. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, आरोग्य, शिक्षण आणि सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून प्रभागात केलेल्या कामांची दखल मतदार घेत असल्याचे घराघरातील प्रचारातून स्पष्ट होत आहे.
घरोघरी भेटी, छोट्या सभा, स्थानिक प्रश्नांवर तात्काळ भूमिका आणि सर्वसामान्य नागरिकांशी असलेली आपुलकी यामुळे भोसले यांची पकड प्रभागात अधिक घट्ट होत चालली आहे. “काम करणारा नेता पुन्हा निवडून यावा” अशी भावना अनेक मतदार उघडपणे व्यक्त करत असून त्यामुळेच विरोधकांमध्ये अस्वस्थता वाढली आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने प्रभाग ९ मध्ये संघटनात्मक ताकद पूर्णपणे झोकून दिली असून कार्यकर्त्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. “हॅट्रिक विजय हा केवळ आकडा नसून जनतेच्या विश्वासाची पावती आहे,” अशी भावना मतदार व्यक्त करत आहेत.
एकीकडे राहुल भोसले यांच्या विजयाची चर्चा जोर धरत असताना, दुसरीकडे विरोधकांकडूनही रणनीती आखली जात आहे. मात्र सध्याच्या राजकीय समीकरणांनुसार आणि मिळणाऱ्या प्रतिसादावरून प्रभाग ९ मध्ये राहुल भोसले यांची हॅट्रिक शक्यतेकडेच सध्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
