पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – प्रभाग क्रमांक 25 मधील निवडणूक रणभूमीत शिवसेना (ठाकरे) पक्षाचे पुणे जिल्हा संपर्क प्रमुख व आमदार सचिन अहिर यांनी जोरदार हल्लाबोल करत विरोधकांच्या राजकारणाचा पर्दाफाश केला. प्रभाग 25 मधील उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ त्यांच्या हस्ते नारळ फोडून करण्यात आला. यावेळी झालेल्या सभेत त्यांनी थेट आणि आक्रमक शब्दांत विरोधकांवर निशाणा साधला.
“मांडीला मांडी लावून बसणारेच आज आरोप-प्रत्यारोप करतात. ज्यांची समाजाशी नाळ तुटलेली आहे, तेच केवळ अफवा आणि कुरघोडीचे राजकारण करत आहेत. समाजाशी थेट नातं असलेला उमेदवार चेतन पवार आज नागरिकांच्या विकासासाठी सज्ज आहे,” असे ठाम मत आमदार सचिन अहिर यांनी व्यक्त केले.
ते पुढे म्हणाले की, सध्याच्या निवडणुकीत काही पक्षांकडून उमेदवार समोर न उभा करता बिनविरोध निवडणुकीचा डाव रचला जात आहे. ही लोकशाहीची गळचेपी असून, ही पद्धत मोडून काढणे अत्यंत गरजेचे आहे. जनतेने सजग राहून अशा कारस्थानांना उत्तर दिले पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.
याचवेळी आमदार अहिर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली आलेल्या कोट्यवधी रुपयांबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. “इतके पैसे आले, पण ते नेमके कुठे गेले? कोणत्या कामासाठी खर्च झाले? याची माहिती आजही जनतेला नाही. हा पैसा कुणाच्या खिशात गेला, याचे उत्तर विरोधकांनी द्यावे,” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
प्रचाराच्या प्रारंभी उमेदवार चेतन पवार यांनीही आपली भूमिका स्पष्ट करत सांगितले की, “आमच्या पॅनलचा एकमेव उद्देश प्रभागाचा सर्वांगीण विकास आहे. ताथवडे गावाचा विकास हा आमच्या केंद्रस्थानी असून, रस्ते, पाणी, ड्रेनेज, स्वच्छता आणि नागरी सुविधांसाठी ठोस काम केले जाईल. मतदारांनी आम्हाला निवडून दिल्यास विकासाचा हा अजेंडा अधिक वेगाने पुढे नेऊ.”
सध्या प्रभाग 25 मधील वातावरण पूर्णपणे बदलले असून, मतदारांमध्ये उत्साह आणि सकारात्मकता स्पष्टपणे दिसून येत आहे. विरोधकांची रणनिती कमकुवत ठरत असताना, चेतन पवार यांच्या नेतृत्वाखालील पॅनलचा विजय निश्चित असल्याची भावना मतदारांमध्ये बळावत आहे. प्रभाग 25 मध्ये यावेळी विकास विरुद्ध अफवांचे राजकारण अशी थेट लढत रंगत असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.
