Spread the love

 

पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १६ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, भारतीय जनता पार्टी आणि आरपीआय आठवले गटाने रावेत–किवळे परिसरात जोरदार शक्तिप्रदर्शन करत प्रचारात आघाडी घेतली आहे. बापदेव महाराजांचे दर्शन घेऊन प्रचाराचा नारळ फोडत भाजप–आरपीआय युतीने निवडणूक रणांगणात दमदार एन्ट्री केली आहे.

किवळे, रावेत आणि मामुर्डी परिसरातील ग्रामस्थांनी शेतीची कामे वेळेआधी उरकून थेट प्रचारात सहभाग नोंदवल्याने भाजप–आरपीआय युतीच्या प्रचाराला मोठे बळ मिळाले आहे. “विकासासाठी पुन्हा एकदा संधी द्या” या संदेशासह घरोघरी भेटीगाठी घेत मतदारांशी थेट संवाद साधण्यात येत आहे.
भाजप–आरपीआयचे अधिकृत उमेदवार दीपक भोंडवे, धर्मपाल तंतरपाळे, संगीता भोंडवे आणि शिल्पा राऊत यांनी प्रचाराचा झपाटा वाढवत तळागाळातील मतदारांपर्यंत पोहोचण्यावर भर दिला आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, नागरी सुविधा आणि विकासकामांच्या मुद्द्यावर त्यांनी मतदारांसमोर ठोस भूमिका मांडली आहे.

दरम्यान, प्रचारादरम्यान भाजप–आरपीआयचे उमेदवार दीपक भोंडवे यांनी विरोधकांचा जोरदार समाचार घेतला. “फक्त आरोपांची राजकारणं करून जनतेची दिशाभूल करणाऱ्यांना यावेळी जनता योग्य जागा दाखवेल,” असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला.
७५ हजारांहून अधिक मतदारसंख्या असलेल्या या प्रभागात भाजप–आरपीआय युती, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना (शिंदे गट) आणि काँग्रेस यांच्यात चौरंगी लढत रंगली आहे. त्यामुळे १६ जानेवारी रोजी विजयाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार, याकडे केवळ प्रभागच नव्हे तर संपूर्ण पिंपरी-चिंचवड शहराचे लक्ष लागले आहे.

एकूणच प्रभाग १६ मध्ये भाजप–आरपीआय युतीचा प्रचार आक्रमक, संघटित आणि आत्मविश्वासपूर्ण दिसत असून, विरोधकांच्या गोटात मात्र वाढती अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे.

Share.
Leave A Reply

Please Join Our WhatsApp Group
Exit mobile version