पिंपरी, (महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज) – पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ च्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपकडून प्रचाराचा अधिकृत शुभारंभ रविवारी (दि. ४ जानेवारी २०२६) सकाळी ९ वाजता चऱ्होली येथील वेताळबुवा चौकात उत्साहात पार पडणार आहे. या कार्यक्रमामुळे प्रभागात निवडणुकीचे राजकीय वातावरण अधिक तापणार असल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपचे प्रभावी नेतृत्व असलेले आमदार महेशदादा लांडगे यांच्या उपस्थितीत विधीवत पूजन व नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी भाजपचे उमेदवार सौ. सारिका रवींद्र गायकवाड, नितीन प्रताप काळजे, सौ. अर्चना राजेश सस्ते आणि सचिन श्रीधर तापकीर यांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभणार असल्याचा विश्वास कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला परिसरातील ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत. ‘प्रभागातील नागरिक हीच आमची ताकद’ या संदेशासह भाजप विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक रणशिंग फुंकणार असून, प्रभाग क्रमांक ३ मध्ये भाजपची बाजू भक्कम असल्याचे चित्र या कार्यक्रमातून स्पष्ट होणार आहे.
